अमेरिकेमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या संख्या ३२ हजारांहून अधिक झाली आहे. गुरुवारी (१६ एप्रिल २०२०) अमेरिकेमध्ये एकाच दिवसात ४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे. एकीकडे करोनामुळे देशामध्ये हाहाकार माजलेला असतानच दुसरीकडे विरोधकांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करोनासंदर्भातील सूचना गांभीर्याने घेतल्याने अमेरिकेवर करोनाचे संकट आल्याची टीका केली जात आहे. त्यातच आता ट्रम्प यांच्या सल्लागारांपैकी एक असणाऱ्या केलीन कॉनवे यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

ट्रम्प यांच्या प्रशासनामधील वरिष्ठ सल्लागारांपैकी एक असणाऱ्या केलीन यांनी एका टीव्ही शोदरम्यान एक गोंधळवून टाकणारं वक्तव्य केलं आहे. कोवीड-१९ या विषाणूच्या नावामधील १९ या आकड्याचा केलीन यांनी अगदी भलताच अर्थ लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आवडता कार्यक्रम असणाऱ्या फॉक्स अण्ड फ्रेण्ड्समध्ये केलीन सहभागी झाल्या होत्या. यावेळेस अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबवण्यासंदर्भातील निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना त्यांनी, “काही संशोधक आणि डॉक्टरांनी या विषाणूचे आणखीनही स्ट्रेन (रचना) सापडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा कोवीड-१९ आहे, कोवीड-१ नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवर आणि माहितीवर काही लोकांचे नियंत्रण आहे” असे मत व्यक्त केल्याचे एमएसएनबीसी डॉट कॉमने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास केलीन यांना याआधी १८ वेगवेगळ्या प्रकारचे करोना विषाणू अस्तित्वात होते असं म्हणायचं होतं. त्यानंतर आता कोवीड-१९ आल्याचे केलीन यांना सांगायचे होते.

कोवीड-१९ चा खरा अर्थ काय?

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने या विषाणूचे नामकरण केलं आहे. करोना हा आजार असल्याचे डब्ल्यूएचओने घोषित केलं आहे. हा आजार ज्या विषाणूमुळे होतो त्या विषाणूला कोवीड-१९ (COVID-19) हे नाव देण्यात आलं आहे. एखादा रोग पसरवणाऱ्या विषाणूची उत्पत्ती कुठे, कधी आणि कशी झाली यावरुन डब्ल्यूएचओ मार्फत त्या विषणूला नाव दिले जाते. याच पार्श्वभूमीवर COVID-19 हे नाव देण्यात आलं आहे. COVID-19 मधील COVID हा शब्द तीन शब्दांची अद्याक्षरे घेऊन तयार झाला आहे. यामध्ये CO म्हणजे Corona, VI म्हणजे Virus आणि D म्हणजे Disease या तीन शब्दांचा समावेश आहे. या तीन शब्दांचा मिळून COVID हा शब्द तयार झाला आहे.

आता प्रश्न पडतो हे १९ काय आहे. तर १९ हा आकडा या विषाणूचा कोणत्या साली शोध लागला त्यावरुन ठरवण्यात आला आहे. चीनमधील वुहानमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून या विषणुमूळे आजारी पडणाऱ्यांची नोंद सापडते. त्यामुळे या विषणूला नाव देताना 19 हा आकडा वापरण्यात आला आहे. म्हणजेच COVID-19 या नावाची फोड सोप्या भाषेत करायची झाल्यास १९ साली सापडलेला करोना व्हायरस आजार अशी करता येईल.