मोठ्या आवाजात ओरडून बोलण्याची सवय असणाऱ्यांनी आता सार्वजनिक ठिकाणी जरा संभाळून बोलावे लागेल. मोठ्या आवाजात बोलल्याने त्यामाध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ शकतो असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. मोठ्या आवाजात बोलताना तोंडातून निघाणारे ड्रॉपलेट्स (म्हणजेच द्रव्याचे थेंब) जास्त काळ म्हणजेच जवळजवळ आठ मिनिटांसाठी हवेमध्ये राहतात. करोनाग्रस्त व्यक्तींच्या तोंडातून निघालेले हे ड्रॉपलेट एखाद्याच्या चेहऱ्यापर्यंत गेले तर त्याला करोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या आवाजात बोलल्याने संसर्गाचा धोका वाढतो यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल अमेरिकेमधील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये छापून आला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलं आहे.

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डायबेटीजच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितरित्या या विषयावर संशोधन केलं आहे. नर्सिंग होम, कॉन्फरन्स आणि घरांमध्ये करोनाचा संसर्ग का वाढत आहे या संदर्भातील उत्तर शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं होतं. एखादी व्यक्ती मोठ्या आवाजात बोलताना तिच्या तोंडातून किती ड्रॉपलेट म्हणजेच थुंकीचे लहान कण बाहेर पडतात यासंदर्भात लेझर लाइट तंत्रज्ञानाद्वारे निरिक्षण करण्यात आलं. “मोठ्या आवाजात बोलताना व्यक्तीच्या तोंडातून दर सेकंदाला हजारो लहान लहान ड्रॉपलेट बाहेर पडत असल्याचे लेझर लाइट तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या निरिक्षणात दिसून आलं,” असं या संशोधनात नमूद करण्यात आल्याचं ‘द वॉशिंग्टन पोस्ट’नं म्हटलं आहे.

दक्षिण कोरिया तसेच चीनमधील रेस्तराँमधील पहाणीनंतर लहान लहान ड्रॉपलेटच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळेच हवेमध्ये जास्त काळ राहणाऱ्या ड्रॉपलेटचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनामध्ये मोठ्याने बोलल्याने जास्त प्रमाणात ड्रॉपलेट्स तयार होतात हे दिसून आलं. या संशोधनानुसार एका मिनिटासाठी मोठ्या आवाज बोलल्याने हवेमध्ये एक हजार असे ड्रॉपलेट सोडले जातात ज्या माध्यमातून विषाणूंचा संर्सग होऊ शकतो. हे ड्रॉपलेट आठ मिनिटांसाठी हवेत राहतात.

“या संशोधनामधून बोलताना हवेमध्ये किती ड्रॉपलेट सोडले जातात आणि त्यामाध्यमातून संसर्ग कशाप्रकारे होऊ शकतो हे सिद्ध होत आहे. तोंडामधून हवेत सोडण्यात आलेले ड्रॉपलेट १० मिनिटांपर्यंत असतात आणि या माध्यमातून संसर्गाचा धोका वाढतो असंही संशोधनामधून दिसून आलं. तसेच बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून किती, कोणत्या आकाराचे आणि कितीवेळा ड्रॉपलेट निघतात याबद्दलही यामधून माहिती मिळाली,” असा संशोधनाच्या अहवालात वैज्ञानिकांनी नमूद केलं आहे.