लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून देशभरात सुरूवात झाली. पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. सोमवारपासून अनेक राज्यांनाही काही प्रमाणात नियम शिथिल केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच अनेक राज्यांनी महसूल मिळणाऱ्या दारुच्या दुकानांना परवानगी दिली आहे. सोमवारपासून दारुच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.  लॉकडाउनच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पाळण्यात येणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही भंग झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. काही ठिकाणी तर अगदी एक किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. असं असतानाचा मध्य प्रदेशमधील एका ठिकाणी दारुची दुकाने दीड महिन्यानंतर उघडण्यात आल्यानंतर एकही गिऱ्हाईक तिकडे फिरकल्याचे दिसले नाही. यासंदर्भातील फोटो ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने पोस्ट केले आहेत.

अनेक राज्यांप्रमाणेच मध्य प्रदेश सरकारनेही काही ठिकाणी दारुची दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातील बडवानी जिल्ह्यातही दारुची दुकाने सुरु करण्यात आली. जवळजवळ दीड महिन्यांनी दारुची दुकाने सुरु होत असल्याने येथे मोठी गर्दी होईल अशी शक्यता असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता. मात्र या दुकानांकडे एकही गिऱ्हाईक भटकला नाही. असं का झालं यासंदर्भात वेगवेगळे तर्क लावले जात असतानाच यामुळे दुकान मालकांची निराशा झाल्याचे समजते.

एकीकडे देशात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचं भान न राहिल्याचे चित्र देशभरात दिसत असतानाच दुसरीकडे दुकानांसमोर एकही गिऱ्हाईक नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करुन असं का झालं असावी यासंदर्भात मदेशीर चर्चा केल्याचेही दिसत आहे.