करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतामध्ये २५ मार्चपासून १४ एप्रिलदरम्यान २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांना रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटायला जाता येत नाहीय. तामिळनाडूमधील अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. त्यामुळेच तेथील नागरिकांनाही रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटता येत नाहीय. मात्र अशावेळी रुग्णलयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांची काळजी घेताना दिसत आहेत. द मद्रास मेडिकल मिशन हॉस्पीटलमधील असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एका वयस्कर रुग्णाला डॉक्टर स्वत:च्या हाताने जेवण भरवताना दिसत आहेत.

‘द इंडिय एक्सप्रेस’चे पत्रकार अरुण जनार्धन यांनी हा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला कॅप्शन देतात ते म्हणतात, “या रुग्णाचे नातेवाईक त्याला भेटायला येऊ शकते नाहीत. त्यावेळेस मद्रास मेडिकल मिशन हॉस्पीटलमधील वरिष्ठ डॉक्टकर जॉर्ज अब्राहम यांनी या रुग्णाला स्वत:च्या हाताने खाऊ घातलं. याला म्हणतात खरं औषध.”

या फोटोला एक हजार ९०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. सात हजार लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करुन आपली मतं नोदंवली आहेत.

मी एक चांगली बातमी शोधत होतो ती दिल्याबद्दल धन्यवाद

मी यांना ओळखतो…

इथले सगळेच डॉक्टर चांगले आहेत.

यांच्याबद्दल आदर वाटतो

त्यांनी माझ्या पत्नीलाही खाऊ घातलं होतं

किती ती सकारात्मकता

…म्हणून डॉक्टरांना देव म्हणतात

अशी सकारात्मकता हवी

देव त्याचं भलं करो

देशामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांचे काम वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्यातही डॉक्टर आणि नर्स अशापद्धतीने रुग्णांना सहकार्य करताना दिसत आहेत.