सध्या देशभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. नागरिकांनी घरात रहावे यासंदर्भातील आवाहन पोलिसांबरोबरच प्रशासनामार्फत केलं जातं आहे. मात्र यासर्वांमध्ये आपल्या भन्नाट ट्विटमुळे चर्चेत असणारे मुंबई पोलीस पुन्हा आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या उत्तम रिप्लाय सेन्समुळे आणि तरुणांच्या आवडत्या मिम्सच्या भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत समोपदेशनाचे आणि घरात राहण्याच्या तसेच करोनासंदर्भातील आवाहन करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंड आहे. काळानुसार बदल करत तरुणांच्या भाषेतच त्यांच्याच भाषेत समजवण्यासाठी मुंबई पोलीस अनेकदा ट्रेण्डींग असणाऱ्या गोष्टींचा आधार घेत असतात. आता हाच कित्ता महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन गिरवला असून त्यांनी ‘नेटफ्लिक्स’वरील ‘थर्टी रिझन्स व्हाय’ सिरिजवर आधारित एक मीम शेअर करत घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.

‘थर्टी रिझन्स व्हाय’मध्ये क्ले जेन्सन ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता दिलन मिनेट याचा फोटो असणारी पोस्ट महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. मूळ पोस्टरवरील ‘You couldn’t save me’ या वाक्याऐवजी मराठी वाक्य लिहिलेलं आहे. पोलिसांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मूळ वाक्याऐवजी ‘बाहेर तुम्ही असुरक्षित आहात’ या वाक्यापुढे गुणिले १३ असं लिहिण्यात आलं आहे. तर पोस्टरच्या खालील भागामध्ये, ‘थर्टी रिझन्स व्हाय’च्या पुढे ‘घराबाहेर पडायचं नाही’ असं लिहिलेलं आहे. म्हणजेच तुम्ही घराबाहेर असुरक्षित आहात त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडू नका असं महाराष्ट्र पोलिसांना राज्यातील जनतेला सांगायचं आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी घरीच राहा, घरीच थांबा सुरक्षित राहा, करोवाविरुद्धचे युद्ध असे हॅशटॅग दिले आहेत.

नक्की वाचा >> ‘कासा ला पडता बाहेर’; महाराष्ट्र पोलिसांची ‘मराठमोळी स्पॅनिश’ भाषा झाली व्हायरल

कालच महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन ‘नेटफ्लिक्स’वरील ‘मनी हाइस्ट’च्या पार्श्वभूमीवर अस्सल मराठमोळ्या स्पॅनिश भाषेत एक भन्नाट पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी मराठमोळ्या स्पॅनिश भाषेत राज्यातील जनतेला घराबाहेर जाऊ नका असं सांगितलं आहे. ‘मनी हाइस्ट’मधील मुखवट्यांच्या फोटोवर ‘कासा ला पडता बाहेर’ असं लिहिण्यात आलं होतं. या पोस्टरचीही सोशल नेटवर्किंगवर चांगली चर्चा रंगली होती.