27 May 2020

News Flash

महापौरांनी नागरिकांना केलं घरी थांबण्याचं आवाहन; महापौरांच्या पत्नीलाच पार्टी करताना बारमधून झाली अटक

या प्रकरणाची शहरभर चर्चा सुरु आहे, यासंदर्भात महापौरांनी एक पत्रक जारी केलं आहे

महापौरांच्या पत्नीलाच अटक (प्रातिनिधिक फोटो)

अमेरिकेमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये करोना वेगाने पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी शटडाउनची घोषणा मागील आठवड्यापासूनच करण्यास सुरुवात केली आहे. इलिनॉइस राज्यातील अल्टोन शहराच्या महापौरांनी मागील आठवड्यामध्ये लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

“सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे. मी तुम्हाला विनंती करत आहे की घरीच थांबा. पालकांनाही आपली मुलं घराच राहतील यासंदर्भात दक्षता घ्यावी. आपल्या सर्वांच्या आरोग्यसाठी हे खूप महत्वाचे आहे,” असं आवाहन अल्टोनचे महापौर ब्रॅण्ट वॉकर यांनी जनतेला केलं. महापौरांनी शुक्रवारी हे आवाहन केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्येच पोलिसांनी शहरातील एका बारवर छापा टाकून पार्टी करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतलं. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये वॉकर यांच्या पत्नीचाही समावेश होता.

यासंदर्भात वॉकर यांनी सोमवारी एक पत्रक जारी केलं आहे. इलिनॉइस राज्यामध्ये लॉकडाउनच्या सूचना दिलेल्या असतानाही नियमांचे उल्लंघन करुन एकत्र आलेल्या काही जणांवर पोलिसांनी रविवारी रात्री एकच्या सुमारास कारवाई केल्याची माहिती या पत्रकामध्ये देण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये वॉकर यांच्या पत्नीचाही समावेश असून यासंदर्भात पोलिसांनी फोनवरुन वॉकर यांना माहिती दिली.

“एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे माझ्या पत्नीवर कारवाई केली जावी. घरात राहण्याचे सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर जी कारवाई केली जाते तीच कारवाई तिच्यावर करावी. तिला कोणत्याही पद्धतीची विशेष वागणूक दिली जाऊ नये,” अशा सुचना आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे वॉकर यांनी पत्रकामध्ये म्हटलं आहे.

इलिनॉइस राज्यामध्ये एकत्र गटागटाने अधिक लोकांनी एकत्र येऊ नये यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. मात्र महापौरांच्याच पत्नीने हा नियम मोडल्याने शहरामध्ये यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. “माझी पत्नी ही स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. मात्र यावेळी तिचा निर्णय चुकला. घरी राहण्याचा राज्यभरात जारी करण्यात आलेला आदेश न पाळल्याबद्दल तिच्यावर आता कारवाई केली जाईल,” असं वॉकर यांनी स्पष्ट केलं आहे.

इलिनॉइसमध्ये दिवसोंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यामध्ये १३ हजार ५०० हून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला असून ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एक हजार १६६ रुग्ण हे अतिदक्षता विभागात असून ८२१ जणांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 10:37 am

Web Title: coronavirus mayor cracks down on parties amid covid 19 lockdown but his wife defies orders to drink at bar scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 हनिमूनला गेलेलं कपल लॉकडाउनमुळे मालदीवमध्ये अडकून पडलं पण…
2 Video: एकाच पर्यटनस्थळावर २० हजार जणांची गर्दी, निर्बंध उठवल्यानंतर चीनमध्ये उडाला गोंधळ
3 लॉकडाउन : “अन्न आणि पैसेही संपलेत, मोबाईलवर बातम्या पाहत दिवस ढकलतोय”
Just Now!
X