भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी देशातील मीडियावर चांगलीच संतापलीये. “माझी सर्व माध्यमांना विनंती आहे की, कृपया अशा संवेदनशील वेळी तरी खोट्या बातम्या देणे थांबवा… तुम्हाला लाज वाटायला पाहिजे…जबाबदार पत्रकारिता कुठे गायब झाली आहे काय कळत नाही…”अशा आशयाचं ट्विट करत साक्षीने माध्यमांविरोधात आपला संताप व्यक्त केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

का संतापली साक्षी? :-
करोना व्हायरसविरोधातील लढाईमध्ये मदत म्हणून धोनीने १०० कुटुंबांसाठी केवळ एक लाख रुपये दान केल्याचं वृत्त काल(दि.२७) सोशल मीडियावर पसरलं. काही माध्यमांनीही याबाबतचे वृत्त आपल्या संकेतस्थळांवर दिले. त्यानंतर सोशल मीडियामध्ये धोनीविरोधात नेटकऱ्यांनी राग व्यक्त करत केला. अनेक नेटकऱ्यांनी तर, ‘वर्षाला ८०० कोटी रुपये कमावणारा धोनी मदत म्हणून केवळ एक लाख रुपये देतो’, असे म्हणत धोनीला जोरदार ट्रोल केले.

खरंच धोनीने दान केले एक लाख रुपये? :-
एका रिपोर्टनुसार, पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन नावाच्या एका एनजीओने करोना व्हायरसमुळे संकटांचा सामना करावा लागणाऱ्या १०० कुटुंबांच्या मदतीसाठी १२.५ लाख रुपये जमवण्याचं ठरवलं होतं. पण, त्यात एक लाख रुपये कमी पडत होते, त्यामुळे क्राउडफंडिंग वेबसाइट केटोच्या माध्यमातून धोनीने एक लाख रुपये देऊन केवळ ती रक्कम पूर्ण केली. मात्र, धोनीने अद्याप स्वतःकडून मदत जाहीर केलेली नाही.

साक्षीने आपल्या ट्विटमध्ये मीडियाविरोधात अचानक राग व्यक्त करण्याचं कारण नमूद केलेलं नाही. पण, मदत जाहीर केलेली नसतानाही धोनीबाबत खोट्या बातम्या पसरवण्यात येत असल्यामुळेच साक्षीने संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus ms dhoni donation of 1 lac are rumors sakshi dhoni angry on media sas
First published on: 28-03-2020 at 07:39 IST