जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. २२ लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. भारतामध्येही करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या १४ हजारांहून अधिक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देश एकमेकांच्या मदतीला सरसावले आहेत. भारताने जगभरातील अनेक देशांना औषधांची निर्यात केली आहे. भारतामधील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच साऱ्या पार्श्वभूमीवर या लढाईमध्ये आम्ही भारतासोबत आहोत आणि भारताला या लढाईसाठी शक्ती मिळो अशी सदिच्छा स्वित्झर्लंडने व्यक्त केली आहे. हा संदेश देतानाच स्वित्झर्लंडने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगामध्ये तेथील एका मोठ्या पर्वतावर रोषणाई केली आहे. स्वित्झर्लंड आणि इटलीच्या सीमेवर असणाऱ्या आलप्स पर्वत रांगामधील झरमॅट मॅटरहॉर्न (Zermatt Matterhorn) पर्वतावर तिरंग्याच्या रंगातील ही रोषणाई करण्यात आली आहे.

“जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी एक असणाऱ्या भारत सध्या करोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भारतासारख्या मोठ्या देशासमोर आव्हानेही मोठी आहेत. म्हणून सर्व भारतीयांसोबत आम्ही आहोत आणि या लढाईसाठी त्यांना ताकद मिळो अशी सदिच्छा व्यक्त करण्यासाठी मॅटरहॉर्नवर हा तिरंगा झळकवत आहोत,” अशा मजकुरासहीत झरमॅट मॅटरहॉर्नच्या फेसबुकपेजवर तिरंग्यामधील मॅटरहॉर्नचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. लाइट आर्टिस्ट असणाऱ्या गेरी हॉफस्टेटर याच्या संकल्पनेमधून ही रोषणाई करण्यात आली आहे. हा तिरंगा १४ हजार ६९२ फूट उंच पर्वतावर झळकवला आहे. गॅब्रिएल पेरेन या छायाचित्रकाराने हा अप्रतिम फोटो आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

जिनेव्हा येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी असणाऱ्या गुर्लीन कौर यांनाही या पर्वताचे फोटो शेअर केले आहेत. “हिमालयापासून ते आलप्सपर्यंतची मैत्री”, असं कॅप्शन या फोटोला गुर्लीन यांनी दिलं आहे.

भारताबरोबरच या पर्वतावर जपान, जर्मनी, युनायटेड किंग्डम, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि इतर देशांचेही राष्ट्रध्वाजांची रोषणाई मागील आठवडाभरामध्ये करण्यात आली आहे.

अमेरिका

जपान

जर्मनी

युनायटेड किंग्डम

स्पेन

फ्रान्स

जगभरामधील जे देश करोनाच्या संकटाचा सामना करत आहेत अशा देशांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या झरमॅट मॅटरहॉर्नने केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.