करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी मागील काही आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. थायलंडमध्येही लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करुन पुन्हा हळूहळू दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. देशामध्ये मॉल सुरु करण्यालाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाचा संसर्ग होणार नाही यासंदर्भातील सर्व काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळेच अनेक मॉल्सने प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरचे फवारे, सम किंवा विषम टेबलवर बसण्याच्या सूचना असे नवे नियम लागू केले आहेत. मात्र येथील एका मॉलने येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना लिफ्टमधील बटणांच्या माध्यमातून संसर्ग होऊ नये म्हणून बटणांऐवजी थेट पेडलसची सोय केली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

येथील सीकॉन स्कवेअर (Seacon Square) मॉल लॉकडाउननंतर पुन्हा सुरु झाला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या मॉलमध्ये आल्यानंतर लिफ्टचा वापर करणारे ग्राहक थोडे गोंधळल्याचे चित्र दिसत आहे. मॉलमधील लिफ्टची बटण बंद करण्यात आली असून थेट पायाजवळ पेडलची सुविधा देण्यात आली आहे. संसर्ग होऊ नये म्हणून पायांनीच ज्या मजल्यावर जायचे आहे तेथील बटण दाबवण्याचे हे स्मार्ट तंत्रज्ञान मॉलने वापरण्यास सुरुवात  केली आहे. सुरुवातील ग्राहक गोंधळात पडत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने आणि थेट स्पर्श न करता लिफ्ट वापरण्याचा हा पर्याय फायद्याचा असल्याचे मत अनेक ग्राहकांनी व्यक्त केलं आहे.

थायलंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले असून रविवारपासून मॉल सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. थायलंडमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. थायलंडमध्ये तीन हजारहून अधिक करोनाग्रस्त अढळून आले असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.