जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. मागील अनेक आठवड्यांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे ५० हून अधिक संस्थांच्या माध्यमातून जगभरामध्ये करोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच आता जागतिक आरोग्य संघटनेने करोना कधीच जाणारच नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अनेक तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनीही करोनाबरोबर जगण्याचा मार्ग शोधला पाहिजे असं मत नोंदवलं आहे. अशाच आता करोनानंतरचे जग कसे असेल याची झळक वेगवगेळ्या देशांमध्ये सुरु झालेल्या व्यवहारांवरुन पहायला मिळत आहे. मग चीनमधील मास्क घालून शाळेत बसलेली मुलं असो किंवा तैवान आणि इतर देशांमध्ये बदललेली हॉटेल व्यवस्था असो करोनानंतर जग वेगळं असणार हे मात्र निश्चित. मात्र अशातच आता करोनानंतर फॅशन जगतामध्ये काय बदल असतील याची झलकही पहायाल मिळत असून बिकिनीऐवजी करोनानंतर ट्रिकिनीचा ट्रेण्ड अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता बऱ्याच काळापर्यंत आपल्याला सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर इटलीमधील एका फॅशन डिझायनरने ट्रिकिनीची संकल्पना मांडली असून त्याने यासंदर्भातील काही ट्रिकिनीच्या काही डिझाइन्सही तयार केल्या आहेत. सध्या या ट्रिकिनीची चांगलीच चर्चा इंटरनेटवर रंगल्याचे दिसत आहे.

ट्रिकिनी म्हणजे काय?

बिकिनीवर मास्क घालणे म्हणजेच ट्रिकिनी. मात्र हे मास्कही बिकिनीशी मॅचिंग असणार आहे. त्यामुळेच ब्रा, पॅण्टी आणि मास्क अशा तीन गोष्टींचा सेट इटालीयन डिझानरने तयार केला असून त्याला ट्रिकिनी हे नाव दिलं आहे. बिकीनी म्हणजे दोन वस्त्रे त्यावरुनच ट्रिकिनीचे नामकरण केलं असून तीन वस्त्रांचा सेट म्हणजे ट्रिकिनी. या ट्रिकिनीमधील मास्क हे बिकिनीच्या पॅटर्नचे असणार आहे. विशेष म्हणजे ज्या डिझायनरने ट्रिकिनीची संकल्पना मांडून पहिली ट्रिकिनी बनवली होती ती केवळ गंमत म्हणून बनवली होती.

फोटो सौजन्य: BackGrid

मध्य इटलीमधील सेनिगालिया येथील एलेक्स बीचवेअर टिझियाना स्कार्मुझो (Tiziana Scaramuzzo) या महिला डिझायनरने ही ट्रिकिनी बनवली आहे. इटली सरकारने काही आठवड्यांपूर्वी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंधांची घोषणा केली. त्यानंतर टिझियानाने लोकांना सर्व काही ठीक होईल असं प्रोत्साहन देण्यासाठी करोनाची साथ रोखणारी बिकिनी डिझाइन करताना त्यामध्ये मास्कचा समावेश करत ट्रिकिनी बनवली होती, असं डेली मेलने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

फोटो सौजन्य: BackGrid

बिकिनीचा सर्वाधिक उद्योग होणाऱ्या महिन्यांमध्येच लॉकडाउन केल्याने घरच्यांबरोबर चर्चा करताना टिझियानाने बिकिनीशी मॅच होणारे आणि तसेच पॅटर्न असणारे मास्क बनवण्यास सुरुवात केली. टिझीयानाच्या मुलीने ही ट्रिकिनी घालून काही फोटो काढले आणि सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले. त्यानंतर अनेकांनी टिझियानाला ट्रिकिनीची ऑर्डर दिली आहे.

फोटो सौजन्य: BackGrid

लॉकडाउन एवढा वाढेल आणि त्याचा एवढा मोठा फटका आपल्या उद्योगाला बसेल असं वाटलं नसल्याचं टिझीयाना सांगते. मात्र त्याचवेळी अनेकांनी ट्रिकिनीची ऑर्डर दिल्याने लॉकडाउनंतर चांगले दिवस येतील अशी आशा तिने व्यक्त केली आहे. बिकिनीबरोबर मॅचिंग होणारे मास्क घालायला अनेकांना आवडेल. यामधून फॅशनेबल राहत स्वत:ची सुरक्षाही करता येईल असं मत टिझीयानाने व्यक्त केलं.

सध्या तरी टिझीयाना यांच्या या अनोख्या संकल्पनेवर आधारित ट्रिकीनीच्या अनेकांनी ऑर्डर दिल्या असल्या तरी भविष्यामध्ये जगभरामध्ये हाच ट्रेण्ड पहायला मिळू शकतो असं मत त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करुन अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे खरोखरच करोनानंतर जगभरामध्ये बिकीनीऐवजी ट्रिकिनी घातलेल्या मॉडेल्स पहायला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको.