करोनानं आपल्या आयुष्यात पाऊल ठेवलं त्याला आता वर्ष होऊन गेलं. सुक्ष्मदर्शी यंत्रातून दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या विषाणूनं मात्र, कल्पनेपलीकडचा विध्वंस करून ठेवला आहे. अचानक झालेल्या या विषाणू हल्ल्याने अनेकांची आयुष्य उघड्यावर आली. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या करोना योद्ध्यांवर या विषाणूनं हल्ला केला. या एका वर्षाच्या काळात मृत्यू झालेल्या करोना योद्ध्यांना एका चित्रफितीच्या माध्यमातून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ बघून तुमच्याही डोळ्यात नकळत अश्रु येतील.

तारखेनुसार म्हटलं तर ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. धूलिवंदनाच्याच दिवशी हा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर या विषाणूविरुद्ध एक मोठा लढा सुरू झाला. तो अजूनही सुरूच आहे. कधीही कल्पना न केलेल्या या संकटानं माणसांच्या श्वासावरच हल्ला केला होता. प्रचंड वेगानं फैलावणाऱ्या या महामारीच्या विषाणूनं शेकडो जणांचा बळी घेतला. अनेकांनी आपली प्रिय माणसं गमावली. तर अनेक कुटुंबच या विषाणूनं गिळंकृत केली. यातून करोना योद्धेही सुटले नाहीत.

या एका वर्षाच्या कालावधीत तहान-भूक विसरून आणि गुमदरून टाकणारं आवरण लपेटून करोना योद्धे दिवसरात्र लोकांचे जीव वाचवण्यासाठी झटले. यातील काही जणांना यात आपले प्राण गमावावे लागले. प्राण गमावाव्या लागलेल्या करोना योद्ध्यांच्या कुटुंबांच्या वेदनेचा ठाव घेत टाटा स्टीलने चित्रफित तयार केली आहे. या चित्रफितीतून करोना योद्ध्यांना सलाम करत त्यांच्या कुटुंबीयांना जगण्याचं बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.