सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. त्याच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक अफवा देखील सोशल मीडियावर तितक्याच वेगाने पसरत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका डॉक्टर दाम्पत्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोसोबतच त्यांची एक कथा देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये या डॉक्टर दाम्पत्याच्या फोटोसोबतच एक भावनिक पोस्ट शेअर केली जात आहे. हे दोन डॉक्टर इटलीमधील आहेत. ते दोघेही दिवस-रात्र करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी काम करत आहेत. पण त्यांना आता करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या दोघांना दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. पण त्यांना आपण करोनावर मात करु शकत नाही हे कळाताच ते दोघे रुग्णालयाच्या लॉजमध्ये आले आणि ऐकमेकांना डोळे भरुन पाहू लागले. त्यानंतर अर्धा तासातच त्यांचा मृत्यू झाला अशी कहाणी या फोटोसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता हा फोटो नक्की कुठला आहे? आणि त्यांची खरी कथा काय आहे हे जाणून घेऊया.

त्यांचा हा फोटो इटलीमधील नसून स्पेनमधील आहे. स्पेनमधील बार्सिलोनो विमानतळाजवळील आहे. हा फोटो असोसिएटेड प्रेसचे फोटोग्राफर एमिलो मेरेनट्टी यांनी काढलेला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत १२ मार्च २०२० रोजी स्पेनमधील बार्सिलोना विमानतळावर कपल किस करताना हा फोटो. या आठवड्यात यूरोपमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवशांवर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध घालत्याची घोषणा केली. त्यानंतरचा काढलेला हा फोटो असल्याचे एमिलो यांनी म्हटले. पण या जोडप्याविषयी अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही.

त्यामुळे हा फोटो करोनावर उपचार करत असलेल्या कोणत्याही डॉक्टर दाम्पत्याचा नसून एक सामान्य कपलचा असल्याचे समोर आले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली कथा देखील खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.