अमेरिकेमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. मागील २४ तासांमध्ये अमेरिकेत एक हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अमेरिकेमध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या न्यूयॉर्क शहरामधील मृतांची संख्या कमी झाली आहे. शहरामध्ये बुधवारच्या तुलनेत कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे न्यूयॉर्कमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील सर्वच रस्ते ओस पडले आहेत. त्यामुळे रस्ते रिकामे असल्याने अपघात कमी होणार हे सहाजिक आहे. असं असतानाही मंगळवारी येथे एका पोर्शे गाडीचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघात झालेली गाडी ही लिमीटेड एडीशन कार होती. पोर्शेच्या मीरेज जीटी प्रकारातील या गाडीची किंमत सात लाख ५० हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच पाच कोटी ७५ लाख रुपये इतकी आहे. चालक अंमली पदार्थांचे सेवन करुन गाडी चालवत असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळवारी न्यूयॉर्क शहरामधील सर्वाधिक वस्ती असणाऱ्या मॅनहॅटन भागामध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गाडी चालवणाऱ्या ३३ वर्षीय बेंजामीन चेन याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाडीवर आदळली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या भीषण अपघातानंतरही बेंजामीनने गाडी रिव्हर्स घेत काही झालेच नाही अशा आविर्भावात तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.

एलेव्हन्थ एव्हीन्यू या रस्त्यावर गाडी चालवताना बेंजामीनने किमान पाच गाड्यांना धडक दिली. त्यानंतर तो पुढच्या रस्त्यावर जाऊन थांबला.

पोलिसांनी या प्रकरणात चालक बेंजामीन याला अटक केली असून त्याच्याविरोधात बेजबाबदारपणे गाडी चालवण्याचा तसेच अंमली पदार्थांचे सेवन करुन गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचे व्हिडिओ तसेच फोटो सोशल नेटवर्किंगवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये निळ्या रंगाची पोर्शे गाडी इतर गाड्यांना आदळत जात असताना दिसते. एका व्हिडिओमध्ये तर अपघात झाल्यानंतर बोनेटच्या भागाचे मोठे नुकसान झाले असूनही तोडक्या मोडक्या स्थितीमधील पोर्शे सिग्नलवर उभी असल्याचेही दिसते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पोलीस या चालकावर कारवाई करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

This guy is crazy

A post shared by TURNPIKE RACING LEAGUE®️ (@trlrace) on

न्यूयॉर्कमध्ये लॉकडाउन असल्याने रस्त्यावर कमी वाहने आहेत. मात्र असं असतानाही अनेकजण रस्त्यावरील कमी वर्दळीचा गैरफायदा घेत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवताना दिसत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार अपघातग्रस्त पोर्शे ही लिमीटेड एडीशन गाडी असून जगात अशा केवळ २५ गाड्या आहेत. पोर्शे कंपनीने प्रत्येक मालकासाठी ही खास कार निर्माण केल्याचे सांगण्यात येते.