देशामधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिसरा लॉकडाउन सोमवारपासून सुरु झाला आहे. या लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत असणार आहे. या लॉकडाउनदरम्यान सरकारने करोनाचा कमी प्रादुर्भाव असणाऱ्या ग्रीन झोनमध्ये नियम शिथिल केले असले तरी करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागांना सील करण्याचेही काम सुरु आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या ५० हजार हून अधिक झाली आहे. शक्य त्या सर्व मार्गांनी करोनाचा फैलाव थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र असत असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. असा लोकांवर पोलीसांकडून कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीही रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवरुन घरीच थांबा हा संदेश अगदी हटके पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांच्या आणि तरुणांच्या आवडत्या कार्यक्रम आणि चित्रपटांचा आधार घेत घरीच थांबण्याचे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी आता थेट गुगलची मदत घेतल्याचे दिसत आहे.

घरी बसून कंटळालेल्या नेटकऱ्यांना गुगल मॅपवर वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याचा छंद लक्षात घेत पोलिसांनी एक आगळेवेगळे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या फोटोत गुगल मॅपवर सेफ्टी म्हणजेच सुरक्षा असं सर्च मारल्यावर मुंबईच्या ठिकाणी डेस्टीनेशन आयकॉन दाखवून ‘होम’ म्हणजेच घर असं उत्तर सापडत असल्याचं दिसत आहे. तसेच या फोटोच्या बाजूला गुगल मॅपवर दिसतात त्याप्रमाणे हॉटेल, कॉफी शॉप, पर्यटन स्थळे, बार, पार्किंगच्या जागा, पेट्रोलपंप किंवा इतर कोणत्याही ठिकाणी उगच भटकू नका असा सल्लाही पोलिसांनी दिली आहे. “काखेत कळसा, गावाला वळसा! संपूर्ण जगाच्या नकाशावर शोधून सापडणार नाही एवढी सुरक्षा आपल्या घरीच आहे. मग आपण बाहेर कशाला जायचं? घरी राहूया, सुरक्षित राहूया,” अशी कॅप्शन पोलिसांनी या फोटोला दिली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस अगदी मजेदार पद्धतीने नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. याला नेटकऱ्यांचा उत्तर प्रतिसादही मिळत आहे.