18 November 2017

News Flash

संस्कृतीरक्षकांच्या छळामुळे जोडप्याने शहर सोडलं

भिवंडीत मुस्लिम धर्ममार्तंडानी केलं तरूण प्रेमीयुगुलाला लक्ष्य

लोकसत्ता आॅनलाईन | Updated: March 20, 2017 12:01 PM

व्यक्तिगत बाबींमध्ये धर्मामार्तंडांची ढवळाढवळ

एक तरूण आणि तरूणी एकमेकांवर प्रेम करतात. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी आस्था असते. तो तरूण तिला लग्नासाठी विचारतो. ती आनंदाने होकार देते. आपल्या प्रेमाचं नात्यात रूपांतर होणार या आनंदात ते दोघे एकमेकांना मिठी मारतात.

आणि आठवडाभरात या दोघांना जिवाच्या भितीने राहतं शहर सोडून पळून जावं लागतं!

ही एका सिनेमाची स्टोरी वाटू शकेल पण सिनेमात बहुतेक वेळा नातेवाईकांच्या दबावामुळे प्रेमिकांना पळून जावं लागतं. पण भिवंडीत घडलेल्या या घटनेने दोन जिवांच्या प्रेमात त्यांच्याशी कुठलाही संबंध नसणारे तथाकथित संस्कृतीरक्षक कशी ढवळाढवळ करतात याचं मोठं उदाहरण समोर आलंय.

भिवंडीमधल्या एका मुस्लिम तरूणाने त्याचं प्रेम असणाऱ्या तरूणीला प्रपोज केलं. आपल्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा क्षण ‘स्पेशल’ करण्यासाठी त्याने गुडघ्यांवर खाली बसत आपल्या प्रेमाची तिला ग्वाही दिली. तिने त्याला हो म्हटलं आणि आपल्या मित्राला सपोर्ट करायला आलेल्या या तरूणाच्या दोस्तांनी हा सुंदर क्षण व्हिडिओमध्ये कैद करत आनंदाने टाळ्या वाजवल्या

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आणि भिवंडीतले धर्ममार्तंड आदळआपट करू लागले. या तरूणाने जे केलं ते इस्लामविरोधी आहे अशी आग सगळ्या भिवंडीमध्ये ओकली गेली. आणि या दोघांना धमक्यांचे फोन, मेसेजेस् येऊ लागले. या तरूणाला व्हिडिओवर माफी मागायली लावली गेली आणि त्याच्या माफीनाम्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर या सगळ्यांनी टाकला.

आपल्या प्रेमाच्या भावनांवर आपल्याशी काहीही संबंध नसलेले लोक आपल्याला मारण्याच्या धमक्या देत आहेत हे लक्षात आल्यावर हे दोघे साहजिकच घाबरले. या सगळ्या त्रासामधून स्वत:ला वाचवण्यासाठी या दोघांनीही आता भिवंडी शहर सोडलं आहे. या व्हिडिओमधली ही मुलगी अतिशय ताणाखाली असून आत्महत्येचे विचार तिच्या मनात येत असल्याचं तिच्या आईने सांगितलंय.

कोण कुठले धर्मगुरू? ‘मियाँ बीबी राझी तो क्या करेगा काझी?’ ही म्हण या धर्माचे प्रकांडपंडित म्हणवणाऱ्यांना माहीत नाही का? फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या जाव्यात म्हणून कोणालाही लक्ष्य करण्याच्या धार्मिक नेत्यांच्या वृत्तीच्या कचाट्यात एक निरपराध प्रेमीयुगुल सापडलं आहे.

या प्रकरणात भोईवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि या दोघांना धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत

First Published on March 20, 2017 12:01 pm

Web Title: couple in bhiwandi leaves city to escape from muslim religious fanatics