‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद साधण्याचा, जनतेला संबोधित करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुस्तकाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘एक्झाम वॉरिअर्स’ असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकांच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा हाताळावा याचे धडे ते  विद्यार्थ्यांना देणार आहेत.

मोदींनी लिहिलेलं हे पुस्तक ३ फेब्रुवारीला प्रकाशित होईल. इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. परीक्षेच्या काळात मुलांच्या मनावर ताण असतो. जीवघेणी स्पर्धा, पालकांच्या अपेक्षांचं ओझं यामुळे मुलं अगदी दबून जातात. परीक्षांचा ताण सहन न झाल्यानं काही विद्यार्थ्यांना नैराश्य येते. कधी कधी टोकाचं पाऊल उचलत ही मुलं आपलं आयुष्य संपवतात. अशा वेळी तणावाला कसं सामोर जावं, तणाव नियंत्रण कसं करावं याबद्दलचे वेगवेगळे उपाय मोदी यातून सांगणार आहे. हे पुस्तक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्गदर्शन करणारं ठरणार आहे. पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

पेंग्विनद्वारे या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आलं आहे. यात लहान मुलांच्या चित्रासोबत नरेंद्र मोदींचंही चित्र दाखवण्यात आलं आहे.’विद्यार्थी हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणूनच हा विषय मी लिखाणासाठी निवडला’ असं मोदींनी म्हटलं आहे. जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे हे शिकवण्यापेक्षा ज्ञान कसं आत्मसात करता येईल याबद्दल देशाच्या नव्या पिढीला यातून मार्गदर्शन मिळेल अशी आशा प्रकाशन संस्थेनं व्यक्त केली आहे.