करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी देशभरात व्हेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना दिग्गज ऑटोमेकर कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने दिलासादायक वृत्त दिलं आहे. अवघ्या सात हजार पाचशे रुपयांमध्ये व्हेंटिलेटर बनविण्याची तयारी कंपनीने केली आहे. “आम्हाला बॅग व्हॉल्व मास्क व्हेंटिलेटर किंवा ज्याला अंबु बॅग म्हटले जाते, त्याच्या प्रोटोटाइपला तीन दिवसांमध्ये परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. परवानगी मिळाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सर्वत्र सुरू केली जाईल”, अशी माहिती कंपनीने गुरूवारी दिली. सध्या देशभरात जवळपास 40 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांश मेट्रो शहरे, मेडिकल कॉलेज आणि खासगी रुग्णालयांमध्ये आहेत.

“आम्ही आयसीयू व्हेंटिलेटर बनवणाऱ्या एका स्वदेशी कंपनीसोबत काम करत आहोत. या अत्याधुनिक यंत्रांची किंमत पाच ते १० लाख रुपयांदरम्यान असते. आमच्या टीमने तयार केलेले हे उपकरण (अंबु बॅग) आपात्कालीन परिस्थितीत काही काळासाठी जीवनाचे रक्षण करण्यास सक्षम आहे आणि याची किंमत सात हजार पाचशे रुपयांपेक्षाही कमी असेल असा आमच्या टीमचा अंदाज आहे”, अशी माहिती म​हिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे दिली.

तर, “व्हेटिंलेटरचं डिझाइन सोपं असावं आणि त्याचं उत्पादन जलदगतीने व्हावं यासाठी सध्याच्या व्हेंटिलेटर्स निर्मात्यांसोबत काम सुरू आहे. प्रोटोटाइप व्हेंटिलेटरला तीन दिवसांमध्ये परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. परवानगी मिळाल्यानंतर लगेच ते डिझाइन उत्पानदनासाठी उपलब्ध केले जाईल”, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी दिली.

आणखी वाचा – “शाबास महिंद्रा, देशाच्या व्यवसाय क्षेत्राला अशाच दूरदृष्टी-नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज!”

यापूर्वी, रविवारी(दि.२२) आनंद महिंद्रा यांनी “व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी काय करावं लागेल यावर महिंद्रा ग्रुप तातडीने काम सुरु करेल…आम्ही तात्पुरती काळजी सुविधा केंद्र म्हणून आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स ऑफर करण्यास तयार आहोत…आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन / सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे…तसेच आम्ही करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असून, त्यात मी माझे १०० टक्के वेतन मदत म्हणून देईल, शिवाय आम्ही आमच्या सहयोगींनाही या निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करू” असे जाहीर केले होते.