पाकिस्तानमधील कराचीमध्ये गाई, म्हैशींना खाली आणण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करण्यात करावा लागला आहे. घरात पुरेशी जागा नसल्याने एजाज अहमद यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गाई, म्हैशींना चार वर्षांपूर्वी चौथ्या मजल्यावर ठेवले होते. मात्र आता प्राण्यांचा आकार वाढल्याने शिडीच्या मदतीने त्यांनी खाली आणणे शक्य नव्हते.
चौथ्या मजल्यावर असणाऱ्या गाई, म्हैशींना खाली कसे आणायचे, हा प्रश्न एजाज यांना पडला होता. शेवटी एजाज यांनी प्राण्यांना खाली आणण्यासाठी क्रेनचा वापर करण्याचा निर्णय घेतला. अखेर ६० फुटांवरुन गाई, म्हैशींना खाली आणण्यासाठी एजाज यांच्या घराजवळ क्रेन आणण्यात आली. यावेळी परिसरातील लोक एजाज यांच्या घराजवळ जमा झाला होते. चौथ्या मजल्यावरील प्राण्यांना क्रेनच्या सहाय्याने खाली आणताना अनेक अडचणी आल्या. मात्र अखेर ही कामगिरी व्यवस्थित पार पडली.
‘माझ्या घराजवळ खूपच कमी मोकळी जागा आहे. चार वर्षांपूर्वीही मी इथे राहायला आलो, तेव्हाही परिस्थिती अशीच होती. त्यामुळे गाई, म्हैशींना खाली मोकळे सोडणे शक्यच नव्हते. त्यामुळेच मी त्यांना चौथ्या मजल्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तो एकमेव पर्याय माझ्याजवळ होता. आता त्यांना घरातून बाहेर कठीण झाले होते. म्हणून आम्ही क्रेनचा वापर केला’, अशी माहिती एजाज यांनी दिली.
आपत्कालीन सेवा विभागाने प्राण्यांना चौथ्या मजल्यावरुन खाली आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आतापर्यंतच्या सेवेत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या आव्हानाचा सामना केल्याची प्रतिक्रिया यानंतर आपत्कालीन सेवा विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 5:14 pm