धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू नका, चालत्या ट्रेनमधून उतरू नका अशा सूचना वारंवार दिल्या जातात. या सूचनांकडे दुर्लक्ष करत आपला जीव धोक्यात घालून अनेक जण धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. एक ट्रेन गेली की दुसरी ट्रेन येते, पण जीवाचं काही बरं वाईट झालं तर? पण आपल्याला घाईच इतकी असते की जीवापेक्षा ती ट्रेन पकडणं आपल्याला जास्त गरजेचं वाटतं. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात कितीतरी अपघात झाले आहेत कोणाचे हात गेले कोणाचे पाय, तर कोणाचा जीव गेला. पण तरीही लोक आपला जीव धोक्यात घालतातच. मध्य रेल्वेच्या परेल रेल्वे स्टेशनवरही असाचा प्रकार घडला, धावती ट्रेन पकडण्याच्या नादात एक तरूण ट्रेनखाली येता येता वाचला.

परेल स्ट्रेशनवर एक तरूण धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. या नादात प्लॅटफॉर्मवर सांडलेल्या पदार्थांवर घसरून तो चालत्या ट्रेनखाली येणार होता. पण प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या रेल्वे पोलिसांच्या सर्तकतेमुळे तो थोडक्यात बचावला. परेल स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर हा प्रकार घडला आहे, हा तरूण सुखरूप बचावला असला तरी असा प्रकार त्यानेच काय पण कोणत्याही प्रवाशांनी करू नये असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.