पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद बकरी ईदनिमित्त बैलाची कुर्बानी देणार आहे. यासाठी तो बैल खरेदी करायला आपल्या मुलाबरोबर बैल बाजारात गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे. १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद असून पाकिस्तानमध्ये बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी प्राण्यांची खरेदी करण्यासाठी बाजार भरवले जात आहेत. दरवर्षी पाकिस्तानमध्ये बकरी ईदनिमित्त हजारो प्राण्यांची कुर्बानी दिली जाते. रमजान ईदनंतर बरोबर ७० दिवसांनी येणारा बकरी ईद हा दिवस मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सरफराज अहमद बैलबाजारात फिरताना दिसत आहे. आपला मुलगा आणि जवळच्या मित्रांबरोबर तो कुर्बानीचा बैल खरेदी करण्यासाठी आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बैल खरेदी करण्याआधी तो आपल्या मुलाशी चर्चा करताना या व्हिडिओत दिसत आहे. पाकिस्तानमध्ये बैलाचाही बळी दिला जातो. पाकिस्तानमध्ये बकरी ईदनिमित्त बकरीऐवजी काही ठिकाणी बैलाचाही बळी दिला जातो.

सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ विश्वचषक स्पर्धा खेळला. या स्पर्धेमध्ये पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच आता सरफराजच्या कर्णधारपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद सरफराजकडून काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.