२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी मात केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातला हा भारताला पाकिस्तावरचा सातवा विजय ठरला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यामध्ये ३५ व्या षटकानंतर पाकिस्तानला ५ षटकात १३६ धावा करण्याचं अशक्यप्राय आव्हान देण्यात आलं. साहजिकपणे पाकिस्तानी संघ यामध्ये अपयशी ठरला.

या सामन्याला मँचेस्टरच्या मैदानावर भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारताच्या विविध भागांमधून चाहते हा सामना पाहण्यासाठी मैदानावर हजर होते. यामध्ये महाराष्ट्रामधून सामना पाहण्यासाठी गेलेल्या या खास पाहुण्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डोक्यावर पारंपरिक आगरी समाजाची टोपी घालत आणि हातात हिंदुस्थानके दो शेर अशा नावाचे बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचं पोस्टर घेऊन या चाहत्यांनी भारताला पाठींबा दिला.

या चाहत्यांची नेमकी नाव आतापर्यंत समजू शकलेली नाहीयेत. सोशल मीडियावरील काही युजर्सच्या मते हे चाहते ठाणे-कळवा भागात राहणारे रहिवासी आहेत, मात्र याबाबत अजुनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.