भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग त्याच्या मैदानावरील फटकेबाजीबरोबरच मैदानाबाहेरच्या शाब्दिक फटकेबाजीसाठीही ओळखला जातो. सेहवाग अनेकदा फलंदाजी करताना किशोर कुमार यांची गाणी गायचा, यासंदर्भातील अनेक व्हिडीओ यापूर्वी समोर आलेले आहेत. फलंदाजीबरोबरच सेहवागची अजून एक गोष्ट चर्चेत असायची ती म्हणजे त्याची जर्सी आणि त्यावरील क्रमांक. इतर खेळाडूंप्रमाणे सेहवागच्या जर्सीवरील क्रमांक हा ठरलेला नसायचा. करियरच्या सुरुवातील सेहवाग वेगवेगळ्या क्रमांकाच्या जर्सी घालून बॅटींग करायचा. त्यानंतर तो कोणताच क्रमांक नसणारी जर्सी घालून मैदानावर उतरु लागला. मात्र कोणताच क्रमांक नसणारी जर्सी घालून खेळण्यामागील कारणावर आता सेहवागने खुलासा केला आहे. सेहवागने माझी जर्सी सासू-सुनेच्या वादात अडकल्याचे एका व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

सेहवागने आपल्या ‘वीरु की बैठक’ या कार्यक्रमामध्ये जर्सीच्या क्रमांकाबद्दल खुलासा केला. माझ्या आईची आणि बायकोची निवड वेगवेगळी होती असं सेहवाग म्हणाला. त्यामुळे दोघींनाही समाधानी करण्यासाठी आपण जर्सी न घालता खेळण्यास सुरुवात केली. “मी जेव्हा पहिल्यांदा एक दिवसीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा मला ४४ क्रमांकाची जर्सी मिळाली होती. माझी आई ज्योतिषाकडे जायची. तेव्हा ज्योषिताने तिला ४४ क्रमांक सेहवागसाठी योग्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर माझं लग्न झाल्यावर माझ्या पत्नीने हा क्रमांक तुला शोभून दिसत नाही तो तू बदल असं सांगितलं. आईने मला ४६ क्रमांकाची जर्सी घालण्यास सांगितलं. तर बायकोचं म्हणणं होतं दोन क्रमांकाची जर्सी घाल. त्यामुळेच माझ्या जर्सीमुळे सासू-सुनेचं भांडण होऊ नये म्हणून मी कोणताच क्रमांक घेतला आहे. कारण घरातील सारे समाधानी असतील तर मी समाधानी असेल,” असं सेहवाग म्हणाला.

जर्सी क्रमांकावरुन झालेला वाद

२०११ साली सेहवागच्या जर्सीवरुन बराच वाद झाला होता. सेहवागने या मालिकेमधील बंगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये कोणताच क्रमांक नसणारी जर्सी घालती होती. त्यानंतर आयसीसीने सेहवागला यासंदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र नंतर बीसीसीआयने या प्रकरणामध्ये दखल दिल्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं. सेहवागने कोणताच क्रमांक नसलेली जर्सी घालून खेळलेल्या सामन्यात १७५ धावांची खेळी केली होती.

पहिल्यांदा खेळला तेव्हा म्हणाला होता…

सन २००८ मध्ये सेहवाग पहिल्यांदाच कोणताही क्रमांक नसणारी जर्सी घालून मैदानावर उतरला होता. त्यावेळी यासंदर्भात त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक नसणारी जर्सी वापरु शकतो तर एकदिवसीय सामन्यांमध्ये का वापरु शकत नाही असा प्रश्न सेहवागने विचारलेला. माझ्या कुटुंबियांना या जर्सी क्रमांकामध्ये बदल करण्याबद्दल अनेकांकडून वेगवेगळे सल्ले मिळायचे. त्यामुळे मी कोणताच क्रमांक न वापरण्याचा निर्णय घेतला असंही सेहवाग म्हणाला होता.