मध्य प्रदेशात राहणारे शिवा केवट सध्या त्रस्त आयुष्य जगत आहेत. यामागे कोणतंही आर्थिक किंवा इतर कारण नसून कावळे जबाबदार आहेत. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण खरंच असा प्रकार घडत असून शिवा केवट घराबाहेर पडताच कावळे त्यांना त्रास देत आपला बदला घेत आहेत. एखाद्या व्यक्तीने बदला घेतलेलं आपण अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल पण कावळ्यांनी अशा पद्दतीने बदला घेण्याची घटना आश्चर्यकारक आहे. आपल्या पिल्लाच्या मृत्यूसाठी शिवा केवट यांना जबाबदार धरत कावळे त्यांना आपला शत्रू मानू लागले आहेत.

शिवपुरीमधील सुमेला गावात राहणारे शिवा केवट जेव्हा कधी घराबाहेर पडतात तेव्हा हातात नेहमी काठी ठेवतात. आपल्यावर हल्ला करणाऱ्या कावळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. याची सुरुवात तीन वर्षापुर्वी झाली होती. शिवा केवट यांना एक पिल्लू जाळीत अडकलेलं दिसलं होतं. त्यांनी तात्काळ धाव घेत त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हातून पिल्लाचा मृत्यू झाला.

“माझ्या हातून पिल्लाचा मृत्यू झाला. मी फक्त मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण हे मी त्यांच्यापुढे स्पष्ट करु शकत नाही”, अशी असहाय्य प्रतिक्रिया शिवा केवट यांनी दिली आहे. पिल्लाचा मृत्यू झाल्यापासून शेजारी असणाऱ्या कावळ्यांनी शिवा केवट यांना त्रास देण्यास सुरुवात केली. आपली कोणतीही चूक नसल्याचं शिवा केवट सांगत असले तरी कावळे मात्र त्यांना माफ करण्याच्या कोणत्याही मूडमध्ये दिसत नाहीत.

कावळ्यांच्या हल्ल्यामुळे शिवा केवट यांना काही जखमा झाल्या आहेत. सुरुवातीला आपण हे फार गांभीर्याने घेतलं नव्हतं. पण नंतर हे कावळे इतर दुसऱ्या कोणावर नाही तर फक्त आपल्यावरच हल्ला करत असल्याचं लक्षात आलं. माझी ओळख पटवून ते फक्त माझ्यावरच हल्ला करतात”, असं शिवा केवट यांनी सांगितलं आहे.

कावळ्यांनी एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेवणे आपल्यासाठी आश्चर्यकारक असल्याचं शिवा केवट सांगतात. असं कधी होऊ शकतं याची कल्पना नव्हती असंही ते म्हणतात. “इतक्या वर्षांनी तरी कावळे आपल्याला क्षमा करतील”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.