जगात चमत्कार आजही होतात याची प्रचिती सीआरपीएफचे कमांडंट चेतनकुमार चिताह यांच्या रुपाने पुन्हा एकदा आली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात नऊ गोळ्या त्यांना लागल्या होत्या त्यानंतर दोन महिने ते कोमात होते. पण आता मृत्यूला मात देत ते सुखरूप कोमातून बाहेर आले आहेत.

१४ फेब्रुवारीला काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चेतनकुमार यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या. यातली एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली होती. दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चेतनकुमार यांना श्रीनगरमधील लष्कराच्या रुग्णालयात तातडीने उपचारासाठी नेण्यात आले होते, त्यानंतर दिल्लीतली एम्स रुग्णालयात डोक्यावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांना आणण्यात आले. डोक्यात डोळी लागल्याने ते दोन महिने कोमात होते, पण त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना चेतनकुमार यांनी साथ दिली आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत, डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले असले तरी गोळी लागल्यामुळे त्यांच्या उजव्या डोळ्यांची दृष्टी मात्र गेली.

४५ वर्षीय चेतनकुमार यांना दोन मुलं आहेत. मृत्यूच्या दाढेतून ते सुखरुप बाहेर आल्यानंतर त्यांच्या पत्नी उषा यांनांही आनंदाश्रू अनावर झाले. ”चेतनकुमार रोज फोनवर माझ्याशी संपर्कात असायचे पण त्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला नाही, कंट्रोलरुमध्ये चौकशी केल्यानंतर ते जखमी झाल्याचे मला कळलं. इतरांनी तर त्यांच्या जगण्याची आशा सोडली असली तरी त्यांची जिद्द आणि चिकाटी मी जाणून आहे. म्हणून परिस्थितीतूनही ते सुखरूप बाहेर येतील याची मला पूर्ण खात्री होती.” अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली.