श्रीनगर परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावर मंगळवारी रात्री दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. या भूस्खलनामध्ये एक व्यक्ती अडकली.

 


बुधवारी जेव्हा सीआरपीफ च्या ७२ बटालियनचे जवान गस्त घालत होते त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जवानांनी श्वानपथकाच्या साहाय्याने त्या व्यक्तीला शोधून काढले. त्यानंतर सीआरपीएफ जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत त्या व्यक्तीला मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. सीआरपीएफने केलेल्या बचाव कार्याचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीआरपीफ जवानांनी तात्काळ मातीचा ढिगारा बाजूला करत त्या व्यक्तीचा जीव वाचवला. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. जवानाच्या या शर्थीच्या प्रयत्नाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. येथेली खराब हवामानामुळे जम्मू मार्गावरील अमरनाथ यात्राही स्थगित करण्यात आली आहे.