आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी इच्छा कोणत्या भावाची नसते. तशीच ती केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान राकेश कुमार चौरसिया यांचीही होती. पण वयाच्या २७ व्या वर्षी नक्षलांशी लढताना ते शहीद झाले. राकेश जरी हयात नसले तरी त्यांची शेवटची इच्छा मात्र त्यांच्या इतर सीआरपीएफ जवानांनी पूर्ण केली. त्यांनी राकेश यांची बहिण आरतीच्या लग्नासाठी आर्थिक मदत देऊ केली. गेल्या माहिन्यात थाटामाटात तिचा विवाह ग्वालिअरमध्ये पार पडला.

राकेश  २००९ मध्ये शहीद झाले. इतरांना त्यांचा विसर पडला तरी त्यांचं बलिदान त्यांच्या मित्रांनी व्यर्थ जाऊ न देण्याचं ठरवलं. त्याच्यासोबत प्रशिक्षणासाठी असणाऱ्या काही मित्रांना ज्यावेळी आरतीच्या लग्नाची पत्रिका आली तेव्हा या मित्रांनी एकत्र येऊन ५ लाख रुपयांची मदत गोळा केली आणि ग्वालिअरमध्ये थाटामाटात तिचं लग्न लावून दिलं. राकेशचे इतर मित्र देशाच्या वेगवेगळ्या भागात नियुक्त आहेत त्यामुळे सगळेच आरतीच्या लग्नाला येऊ शकले नाही. पण, आठ मित्रांनी मात्र लग्नसोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

‘आम्हाला कोणतीही कल्पना न देता त्याच्या मित्रांनी पैश्यांची जमवाजमव करायला सुरूवात केली. लग्नाआधी त्यांनी पैसे आम्हाला देऊ केले. पण त्यांच्याकडून मदत आकारणं आम्हाला सोयीचं वाटत नव्हतं म्हणून आम्ही ती मदत नाकारली. पण, कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला मदत केली. राकेशचे मित्र आम्हाला कधीच त्याची कमी जाणवू देत नाही, ते प्रत्येक अडचणीत धावून येतात, अशी प्रतिक्रिया राकेशच्या भावानं ‘इंडिया टुडे’शी बोलताना दिली. राकेशला तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत.