सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. अनेकदा आपण सहज कैद केलेले काही आनंदी क्षण अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलीला पहिल्यांदा ऐकू आल्याने तिच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया कशी आहे हे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ऐकू न येणाऱ्या लहान मुलीच्या कानाला श्रवणयंत्र लावण्यात आले आहे. हे यंत्र लावल्यानंतर आईचा आवाज पहिल्यांदाच कानावर पडल्यावर मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. या लहान मुलीच्या वडिलांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी छान असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओला ५० हजाराहून अधिक लाईक्स आहेत.

या मुलीचे नाव जॉर्जिया असे असून तिच्या वडिलांचे नाव पॉल अॅडिसन आहे. जॉर्जियाला जन्मापासूनच ऐकू येत नव्हते. तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट कळताच त्यांनी तिला श्रवणयंत्र बसवण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी या श्रवण यंत्राद्वारे त्यांनी जॉर्जियाशी पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी हे सुखद आणि आनंदी क्षण व्हिडीओमध्ये कैद करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जॉर्जियाच्या गोंडस चेहऱ्यावरील हे क्षण व्हिडीओमध्ये कैद करत हा व्हिडीओ सोशल मीडियवर शेअर केला. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.