देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग वादळाने धडक दिली आहे. महाराष्ट्रातील अलिबागजवळ या वादळाने समुद्रावरुन भूभागावर प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. मात्र त्यामध्ये एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ निसर्ग वादळाच्या काळातील असल्याचा सांगितले जात असले तरी त्यामागील सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही.
काय आहे व्हिडिओमध्ये
वादळ आल्यानंतर एखाद्या घराचा किंवा इमारतीचा आश्रय घ्या असं सांगण्यात येतं. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे जोरदार वारा आल्यानंतर एक व्यक्ती एका शेडच्या लोखंडी खांबाला पकडून उभा राहतो. मात्र वाऱ्याचा जोर एवढा आहे की हे शेड उडून जातं. मात्र या शेडच्या पत्र्यांना जोडलेला लोखंडी खांब जमीनीमधून उपसला जातो आणि पत्र्याबरोबर उडून जात ९० अंशात इमारतीला आदळतो. मात्र तरीही ही व्यक्ती खांब सोडत नाही आणि थेट दुकानाच्या शटरच्या वरच्या भागात जाऊन पोहचते. त्यानंतर दुकानाच्या शटरच्यावरील भागावर उतरुन खाली उडी मारुन ही व्यक्ती पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
मेजर सौरभ शर्मा (निवृत्त) यांनी ट्विटवरुन हा व्हिडिओ निसर्ग वादळाच्या काळातील असल्याचे सांगत ट्विट केलं आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी व्हिडिओतील व्यक्तीचा उल्लेख स्पायडरमॅन असा केला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी सर्व लोक सुरक्षित राहा अशीही प्रार्थना केली आहे.
Indian Spiderman created by #NisargaCyclone#NisargaSpiderman
Let’s pray of safety of everyone #CycloneNisarg#NisargaUpdates pic.twitter.com/sRWLc4ItYx
— Major Saurabh Sharma Retd (@MajorSaurabhSh1) June 3, 2020
अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरही हा व्हिडिओ निसर्ग वादळाचा व्हिडिओ म्हणून व्हायरल होताना दिसत आहे. “वादळापासून वाचण्यासाठी शेड पकडून उभा होता” या कॅफ्शनसहीत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंस असलं तरी हा प्रकार आताचा आहे की जुना तसेच तो कुठे घडला आहे यासंदर्भात कोणताही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 3:29 pm