कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं तौते चक्रीवादळ गुजरातच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. हे चक्रीवादळ सोमवारी मुंबईजवळच्या समुद्रातून मार्गक्रमण करत होतं. त्यामुळे समुद्र खवळला होता. ताशी १०० किमी जास्त वेगवान वारे आणि पावसामुळे सगळीकडेच अंधारून गेलं होतं. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांना लाटांचे तडाखे बसत होते. चक्रीवादळाने रौद्रवतार धारण केल्यानंतर गेट वे ऑफ इंडिया जवळची व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत.

रविवारी सायंकाळी कोकण किनारपट्टीवर दाखल झालेलं तौते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईसह परिसराला जोरदार तडाखा दिला. मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. लोकल रेल्वे, मोनो रेल आणि हवाई वाहतूक सुद्धा या काळात बंद होती. तर मुंबईच्या किनाऱ्यांवर लाटांचा माराच सुरू होता. मुंबईतील महत्त्वाचं पर्यटन केंद्र असलेल्या गेट वे ऑफ इंडियाजवळची परिस्थिती चक्रीवादळाच्या काळात भयंकर होतं.

गेट वे ऑफ इंडिया परिसरातील व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यातील काही व्हिडीओ गेट वे ऑफ इंडियाजवळील ताज हॉटेलमधून शूट करण्यात आलेले आहेत. चक्रीवादळाच्या काळात समुद्रातील पाणी अगदी काठोकाठ आल्याचं दिसत असून, समुद्र खवळलेला दिसत आहे. समुद्रातील लाटा किनाऱ्या येऊन आदळत असून, अगदी गेट वे ऑफ इंडियापर्यंत धडका देत असल्याचं दिसत आहे. प्रचंड वेगाने वाहत असलेला वारा आणि खवळलेल्या समुद्राचं दृश्य अंगावर शहारे निर्माण करणार आहे.

काही जणांनी हे व्हिडीओ ट्विटरवर ट्विट केले असून, असं दृश्य यापूर्वी कधी बघितलं नसल्याचंही म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे गेट वे ऑफ इंडियाला धडकणाऱ्या या लाटांमुळे समुद्राचं पाणी ताज हॉटेलपर्यंत येत होतं.