तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांच्या मालकीची पन्नास वर्षांपेक्षा अधिक जुनी १९६६ची लँडरोव्हर IIA ही विंटेज कार आता विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ही कार तुम्हीही विकत घेऊ शकता. त्यासाठी २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात लिलाव होणार आहे.

पन्नास वर्षांपेक्षा जुनी असलेली दलाई लामांची ही कार आर. एम. सोदबी या लिलाव कंपनीने विक्रीसाठी काढली आहे. या कारच्या लिलावासाठी जुलै महिन्यांत नोंदणी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात या कारचा लिलाव होणार आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या दलाई लामा यांनी स्वतः ही कार दहा वर्षे (१९६६-१९७६) वापरली.

या कारच्या लिलावासंदर्भात आर. एम. सोदबी कंपनीने आपल्या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, ही कार ८८ इंच व्हीलबेस चासीवर बांधण्यात आली असून १० फेब्रुवारी १९६६ मध्ये तिची बांधणी पूर्ण झाली. त्यानंतर ती १७ फेब्रुवारी १९६६ रोजी ती नेपाळला पाठवण्यात आली. त्यानंतर नेपाळमधून दलाई लामा यांचे बंधू तेनझीन चेओग्याल यांनी ती स्वतःच ड्राईव्ह करीत भारतात आणली त्यानंतर ती दलाई लामा यांच्या सेवेत दाखल झाली. चेओग्याल यांनी हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथील डोंगऱाळ रस्त्यांवर ही कार बहुतेक वेळा चालवली आहे.

तिबेटमधील जे निर्वासित अमेरिकेत दाखल झाले होते त्यांच्यासाठी निधी उभारण्याकरीत ही कार २००५ मध्ये अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथील दलाई लामा फाऊंडेशनला दान करण्यात आली. त्यानंतर लँड रोव्हरने २००६ मध्ये या कारची पुनर्बांधणी केली. यामध्ये नवे इंजिन, ओरिजिनल ब्रॉन्झ ग्रीन पेंट लावण्यात आला, सीट आणि टायर्सही बदलण्यात आले. त्यामुळे ही कार आता नव्या रुपात आणि सुस्थितीत आहे.

या कारला ब्रिटिश मोटर इंडस्ट्रीचे हेरिटेज ट्रस्ट प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. तसेच मूळ मालक चेओग्याल यांची मॅन्युअलच्या पहिल्या पानावर सही आहे. तसेच मालक आणि दान केलेल्या कागदपत्रांवर आणि कारच्या इन्शुरन्स पॉलिसीवर दलाई लामा यांचे नाव आहे. त्याचबरोबर या कारला तिची ओरिजनल नंबर प्लेटही तशीच ठेवण्यात आली आहे. या करचा क्रमांक HIM-7555 असा आहे. HIM हा पूर्वीचा हिमाचल प्रदेशचा वाहन नोंदणी कोड आहे.

ही कारने लँडरोव्हर लाईफस्टाईल मॅगझिन २००७च्या कव्हर पेजवरही झळकली होती. ग्राहकांसाठी ही विंटेज कार एक खास कार असणार आहे. या आयकॉनिक एसयुव्ही कारच्या लिलावासाठी कंपनीच्या https://rmsothebys.com. या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे. या कारची सुरुवातीची लिलावाची रक्कम ही १ लाख ते १.५ लाख डॉलरच्या रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. मात्र, ही कार दलाई लामांची कार असल्याने या पेक्षा खूपच चांगली किंमत तिला मिळेल अशी आर. एम. सोदबी कंपनीला आशा आहे.