संपूर्ण देशभरात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. उन्हामुळे सर्वसामान्यांची गैरसोय तर होतेच मात्र पक्षी-प्राण्यांचा जीव उन्हामुळे व्याकूळ होतो. अशातच किंग कोब्राला एक सर्पमित्र अंघोळ घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांच्यासह अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जवळपास पाच मिनिटांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओत आधी तो व्यक्ती किंग कोब्रावर बादलीने पाणी ओततो. त्यानंतर त्याला दोन्ही हातांनी उचलून पुन्हा त्यावर पाणी ओततो. उन्हामुळे व्याकूळ झालेला कोब्रा मात्र अजिबात आक्रमक होताना दिसत नाही. किंग कोब्रा ही सर्वांत विषारी नागांची प्रजाती. मात्र तो व्यक्ती जराही भीती न बाळगता बिनधास्तपणे किंग कोब्राला अंघोळ घालताना दिसत आहे.

हे पाहण्यासाठी आजूबाजूला लोकसुद्धा जमल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय. त्यानंतर तो सर्पमित्र एका मोठ्या प्लास्टिकवर कोब्राला ठेवतो. कोब्राच्या डोक्यावर दोन-तीन वेळा थाप देतो. तेव्हासुद्धा तो किंचितही आक्रमक होत नाही. मात्र त्यानंतर जेव्हा तो व्यक्ती कोब्राला दोन्ही हातांनी उचलतो, तेव्हा तो दंश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अत्यंत चतुराईने तो व्यक्ती त्याला खाली सोडतो. व्हिडीओच्या शेवटी तो व्यक्ती कोब्राच्या एकदम जवळ जाऊन बसतो.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भयानक पण सुंदर’, अशी प्रतिक्रिया एकाने दिली. तर हे फक्त भारतातच होऊ शकतं, असं दुसऱ्याने म्हटलं.