चार वर्षांपूर्वी ट्विटवर विराटला लग्नाची मागणी घालून इंग्लडच्या महिला क्रिकेट संघातली बॅट्सवुमन डिनिअल वॅटनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. डॅनी T20I Tri-Series साठी सध्या भारतात आली आहे. विशेष म्हणजे तिनं सोबत विराटनं भेट म्हणून दिलेली बॅटही आणली आहे. विराटनं २०१४ मध्ये तिला बॅट भेट म्हणून दिली होती. ही आपली सर्वात ‘लकी’ आणि आवडती बॅट आहे असं डॅनी मोठ्या कौतुकानं सांगते.

विराटनं तिला काहीवर्षांपूर्वी भेट म्हणून दिलेली बॅट तिनं जपून ठेवली होती. T20I Tri-Series सामन्यात डॅनीला नवा विक्रम रचायचा आहे आणि यासाठी विराटनं दिलेली बॅट आपल्यासाठी नक्कीच लकी ठरेल अशी भाबडी आशा तिला आहे, म्हणूनच तिनं ही बॅट इंग्लडहून भारतात सोबत आणली आहे. २०१४ मध्ये टीम इंडिया इंग्लड दौऱ्यावर असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटनं ७२ धावांची दमदार खेळी केली होती. विराटच्या खेळानं प्रभावित झालेल्या डॅनीनं सहज गंम्मत म्हणून ‘माझ्याशी लग्न करशील का?’ असं ट्विट केलं होतं. या ट्विटची सगळ्यांनीच दखल घेतली होती. इतकंच नाही तर डॅनीच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. यानंतर विराट आणि डॅनीनं भेटही घेतली होती.

याचा किस्साही तिनं नंतर सांगितला, डॅनीनं केलेल्या एका ट्विटमुळे त्यावेळी भारतीय माध्यमातून अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. माझी भेट घेतल्यानंतर ‘तू असं ट्विटवर पोस्ट करायला नको होतं, येथे मस्करीत केलेल्या गोष्टींचीही गंभीर दखल घेतली जाते’ असं कोहली आपल्याला म्हणाला असल्याचंही तिनं सांगितलं होतं.