मोबाइलवरील ऑनलाइन गेम मुलांसाठी किती धोकादायक ठरु शकतात याचा विचार करायला लावणारी घटना उत्तराखंडच्या देहरादूनमधून समोर आली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलाने नेहरू कॉलनीत भररस्त्यात एका महिलेवर चाकूने हल्ला केला आणि तिला गंभीर जखमी केलं. धक्कादायक म्हणजे प्राथमिक चौकशीत घटना ऑनलाइन गेमच्या टास्कशी संबधित असल्याचं समोर आलं आहे.

टास्क पूर्ण करण्यासाठी मुलाने महिलेवर हल्ला केल्याची शक्यता मुलाच्या मोबाइलमधील ऑनलाइन गेमच्या चॅटिंगच्या आधारे पोलिसांनी व्यक्त केलीये. गेल्या आठवड्यात गुरूवारी रात्री स्वर्ण गंगा एनक्लेव्हमधील रहिवासी ज्योती नेगी यांच्यावर एकाने हल्ला केला. त्यावेळी ज्योती कॉलनीच्या रस्त्यावर शतपावली करत होत्या, तर पती सिद्धार्थ आहलुवालिया जवळपास 100 मीटर दूर अंतरावर एका दुकानातून दूध खरेदी करत होते. हल्ला करुन मुलगा फरार झाला.

महिलेचा पती सिद्धार्थने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने ज्योतीवर चाकूने हल्ला केला आणि फरार झाला. वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. योगेंद्र सिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार होण्याआधी मुलगा त्याचा फोन घरीच सोडून गेला. त्याच्या फोनमधून समोर आलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन चॅटिंग प्लॅटफॉर्म डिस्कॉर्डवर(Discord) त्याला एखाद्यावर हल्ला करण्याचा टास्क देण्यात आला होता. चॅटिंगमध्ये अनोळखी व्यक्तीने “एखाद्याला मारुन टाक, आत्महत्या किंवा बेपत्ता” असा मजकूर लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, घटनेच्या दिवसापासून मुलगा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, मुलगा सापडल्यावरतीच हल्ला करण्याचं नेमकं कारण समोर येईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.