टीव्ही-सिनेमातील शक्तिमान, बॅटमॅन, स्पाइडरमॅन अशा प्रसिद्ध काल्पनिक पात्रांचे जगभरात अनेकजण चाहते आहेत. पण, दिल्लीचा एक व्यक्ती जेम्स बॉण्ड या कॅरेक्टरचा इतका मोठा चाहता आहे की त्याने चक्क स्वतःचं नाव बदलून जेम्स बॉण्ड ठेवलंय.

विकास कर्दम असं या व्यक्तीचं नाव आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘च्या वृत्तानुसार , तो त्याची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलासह पश्चिम दिल्लीतील नवादा हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहतो. नाव बदलल्यापासून अनेकजण ओळखायला लागलेत असं तो म्हणतो. ‘ही बातमी जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे पसरतेय. अनेकांना हा जोक वाटतोय पण हे सत्य आहे’, असं विकास म्हणाला. पण, नाव बदलल्याचं पत्नीला समजल्यापासन ती प्रचंड चिडलीये असंही विकासने सांगितलं.

“जेव्हा तिला मी नाव बदलल्याचं कळलं तेव्हा तिची रिएक्शन खूप शॉकिंग होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि काहीही न बोलता निघून गेली. गेल्या दोन दिवसांपासून ती माझ्याशी एक शब्दही बोलली नाहीये. नाव बदलल्यामुळे लोकं आता माझी खिल्ली उडवतील असा ती विचार करतेय, पण मी याचा सामना करण्यासाठी तयार आहे. जेव्हा मी लोकांना नाव बदलण्याबाबत सांगायचो तेव्हा मला कोणी गंभीरतेने घेत नव्हतं. पण आता मी नाव बदलल्याचं समजल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलाय”, असं विकास म्हणाला. अजून आई-वडिलांना याबाबत सांगितलं नसल्याचं विकासने सांगितलं. इतकंच काय तर, “बॉन्डचं कॅरेक्टर म्हणजे फूट उंच आणि 70 किलो वजन असलेला व्यक्ती आहे. मी त्यात फिट बसत नाही पण त्याचा मला काही फरक पडत नाही” असंही तो म्हणाला. “सप्टेंबर 2019 मध्ये गुरुग्रामच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली होती. एप्रिल महिन्यातच नाव बदलवायचं होतं, पण करोना व्हायरसमुळे ते लांबणीवर गेलं. अखेर शुक्रवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली. मला माहितीये लोकं माझी खिल्ली उडवतील पण, माझ्यामुळे किमान लोकांना हसण्यासाठी काहीतरी कारण तरी मिळेल” असं विकास उर्फ जेम्स बॉण्डने सांगितलं.