‘नेटफ्लिक्स’ने ९ जुलै रोजी ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. जगभरातील प्रेक्षक या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी ‘सेक्रेड गेम्स २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याचे मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले आहेत. यापैकी एका मीमचा दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून चांगलाच वापर करण्यात आला आहे. या मीमने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

‘सेक्रेड गेम्स २’च्या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठीचा ‘बलिदान देना होगा’ हा डायलॉग चांगलाच गाजतोय आणि त्यावरूनच विविध प्रकारेच मीम्स व्हायरल होत आहेत. याच मीमचा वापर करून दिल्ली मेट्रो प्रशासनाने एक ट्विट केलं आहे. ‘जेव्हा तुम्ही आरक्षित जागेवर बसता..’ असं कॅप्शन देत ‘बलिदान देना होगा’ या संवादाचा मीम या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला. दिल्ली मेट्रो प्रशासनाचा हा अंदाज नेटकऱ्यांनाही आवडला आहे. ‘दिल्ली मेट्रोचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्तीची निवड केली आहे,’ अशा शब्दांत एका युजरने प्रशंसा केली. तर काहींनी आणखी मीम्स शेअर केले.

आणखी वाचा : शाळेत दोनदा नापास झालेला ‘बंटी’; ‘सेक्रेड गेम्स’मुळे बदललं नशीब

‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर पाहिल्यास हे लक्षात येतं की या सिझनमध्ये गणेश गायतोंडेच्या तिसऱ्या बापाची (गुरूजी) महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ही भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठी साकारत आहे. याचसोबत या सिझनमध्ये रणवीर शौरी व कल्की कोचलीन या दोन नव्या भूमिकांची भर पडली आहे. पहिल्या सिझनअखेर पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आता या सिझनमध्ये तरी मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.