माकडांच्या मर्कट चाळ्यांनी आता दिल्लीकर त्रस्त झाले आहे. अगदी सहजपणे ही माकडे घरात ये-जा करतात. घरातील पदार्थांची नासधूस करतात. काही दिवसांपासून तर माकडे घरातील वस्तूंची देखील चोरी करत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे नागरिकांनी केल्या आहेत. यावर आता उपाय म्हणून दिल्ली महापालिकेने एक निर्णय घेतला. माकडांना पकडणा-यांना  दहमहा १८ हजार पगाराची नोकरी देण्याचा निर्णय दिल्ली महापालिकेने घेतला आहे.

Viral : कॉपीला आळा घालण्यासाठी चिनी शिक्षकांनी शोधला रामबाण उपाय

अनेक राज्यात उपद्रवी प्राण्यांमध्ये माकडांचा समावेश केला आहे. दिल्लीच्या अनेक भागांत या माकडांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घरात घुसणे, वस्तूंची आणि पदार्थांची नासधूस करणे, हेच कमी की काय घरातील वस्तू चोरून नेणे अशा एक ना अनेक कारणांमुळे या माकडांनी दिल्लीकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून माकडांनी हल्ले देखील केल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा या उपद्रवी माकडांना आळा घालण्यासाठी दिल्ली महानगर पालिकेने काही दिवसांपूर्वी जाहिरात केली होती. माकडांना पकडा आणि ८०० रुपये मिळवा अशा प्रकराची ती जाहिरात होती. पण त्याला काही प्रतिसाद मिळेना. शेवटी माकड पकडणा-या व्यक्तींना प्रत्येक माकडामागे १२०० रुपये देण्याचे ठरवले पण त्यालाही हवा तसा प्रतिसाद मिळेना. शेवटी माकड पकडणा-यांना दरमहा १८ हजार पगाराची नोकरी देण्याचे महापालिकेने ठरवले असल्याची माहिती ‘आज तक’ ने दिली आहे. आता संदर्भातला प्रस्ताव लवकरच ठेवण्यात येणार असून त्याची जाहिरातही करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे तरी माकडांच्या त्रासापासून दिल्लीकरांना सुटका मिळणार आहे का हे पाहण्यासारखे ठरेल.

Viral Video : मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची विरोधकांसोबत सांगितिक जुगलबंदी