३१ डिसेंबरच्या रात्री मद्याच्या नशेत गाडी चालवल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेबरोबरच सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून ट्विटरवर काही भन्नाट मेसेजेस शेअर करण्यात येत आहेत. या संदेशांच्या माध्यमातून ‘ड्रिंक अँण्ड ड्राईव्ह’सारखे प्रकार रोखले जावेत, हा पोलिसांचा उद्देश आहे. आता यामध्ये त्यांना कितपत यश येते, हे माहिती नाही. मात्र, सध्या भन्नाट आणि मजेशीर मजकूर असलेले हे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिल्ली पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर सुंदर चित्रे रेखाटून हे संदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईतही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मद्यप्रानश करून बेधुंद होणाऱ्या , ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्या मद्यपींवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून ते १ जानेवारी पहाटे सहा वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी चौक आणि महत्त्वांच्या मार्गांवर नाकाबंदीची जागा निश्चित केली आहे. तर शहरातील अतिसंवेदनशील परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त असेल.