निवडणुका म्हणजे आश्वासनांची खैरात याचा अनुभव सध्या देशातील विविध मतदारसंघांमध्ये येत आहे. भारतातले राजकीय पक्ष इतकी आश्वासनं देत आहेत की त्याची मोजदाद करणंही अशक्य व्हावं. परंतु दिल्लीतल्या सांझी विरासत पार्टीनं जी आश्वासनं दिली आहेत, ती बघाल तर तुमचा विश्वासच बसणार नाही. दिल्लीतल्या मतदारांसाठी या पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अर्ध्या किमतीत मद्यापासून ते ईदीच्या दिवशी मुस्लीमांना मोफत बोकड इथपर्यंत आश्वासनांची खैरात या पक्षानं केली आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी जाहीर केलेल्या मनसुब्यात या पक्षानं म्हटलं आहे की मद्याचे दर पन्नास टक्क्यांनी कमी करू. प्रत्येक मुस्लीम कुटुंबाला ईद साजरी करता यावी यासाठी एक बोकड देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. इतकेच नाही तर महिलांना मोफत दागिने देण्याचं आमिषही दाखवण्यात आलं आहे.

अमित शर्मा या पक्षाचे उमेदवार असून त्यांनी आपल्या जाहीरनाम्याची पोस्टरच वाटली आहेत. उत्तर पूर्व दिल्ली या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. विद्यार्थ्यांना पीएचडीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, मोफत किराणा माल, विद्यार्थ्यांना मेट्रो व बसचा मोफत प्रवास, मुलगी जन्माला आलेल्या प्रत्येक घराला ५० हजार रुपये, बेरोजगारांना मासिक १० हजार रुपये, वृद्धांना पाच हजारांची पेन्शन आणि खासगी रुग्णालयामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन सांझी विरासत पक्षानं दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या सत्रात दिल्लीमधल्या मतदारसंघांमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्ष मतदारांना विविध आश्वासनं देत आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर, सांझी विरासत पक्षानं अवाजवी आश्वासनं देऊन एकप्रकारे मुख्य धारेतल्या पक्षांच्या आश्वासनांची खिल्लीच उडवल्याचे या निमित्तानं दिसून येत आहे.