पैसे काढण्यासाठी एटीएम आणि बँकेच्या रांगेत उभे राहण्यासाठी सध्या माणसे भाडेतत्वावर मिळत आहेत अशा एका जाहिरातीने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘बुक माय छोटू’ने ही जाहिरात केली असून या जाहितानुसार बँक किंवा एटीएमच्या रांगेत उभे राहण्यासाठी भाडेतत्वावर  येथे माणसे उपलब्ध होतील असे म्हटले आहे. यासाठी ताशी ९० रुपयांप्रमाणे पैसे आकारले जाणार आहेत.

वाचा : बँकेत रांगा लावण्याच्या भन्नाट पद्धती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. या निर्यणावर देशभरातून संमिश्र प्रतिसाद उमटले आहेत. नोटांबदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी दुस-या दिवशीपासूनच नागरिकांनी बँकेच्या बाहेर रांगा लावायला सुरूवात केली. देशातील गल्लोगल्ली हेच चित्र पाहायला मिळातेय. नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी बँका सुरू होण्याआधीच बँकेबाहेर लांबलचक रांगा लावल्यात. एटीएमबाहेरची परिस्थितीही काही वेगळी नाही. काही तांत्रिक कारणामुळे फक्त काहीच एटीएम मशिन्स सुरू ठेवण्याचा निर्णय सरकार आणि आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे पैशांच्या नितांत गरजेमुळे लोकांनी आपली कामे सोडून तासन् तास बँका आणि एटीएम बाहेर रांगा लावल्या आहेत. अशातच रांगेत उभे राहून हृदयविकाराच्या झटक्याने काही वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या निर्णयामुळे ६० जणांचा जीव गेला आहे.

या लांबलचक रांगापासून लोकांना विश्रांती देण्यासाठी ‘बुक माय छोटू’नेही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या दिल्लीतपुरता ही सुविधा मर्यादित असून एटीएम आणि बँकांबाहेर रांगा लावण्यासाठी माणसे उपलब्ध करून दिली जात आहे. तासाप्रमाणे याचे शुल्क आकारले जात आहे. एका तासासाठी ९० रुपये, दोन तासांसाठी १७० रुपये, तीन तासांसाठी २६० रुपये, चार तासांसाठी ३३० रुपये, पाच तासांसाठी ३८० रुपये तर सहा तासांसाठी ५५० रुपये असे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे या अनोख्या सुविधेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.