सध्या लॉकडाउनमुळे अनेकांना आपले नातेवाईक, कामावरचे सहकारी आणि मित्र परिवाराला भेटता येत नाहीय. प्रियकर-प्रेयसीच्या नात्याचे सुद्धा असेच आहे. सध्या त्यांचाही संवाद फक्त मोबाइलपुरता उरला आहे. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रेयसीला भेटण्यासाठी आतूर झालेला एक युवक चक्क महिलेचा वेश धारण करुन मध्यरात्री घराबाहेर पडला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

महिलेचे कपडे घातले म्हणून पोलीस आपल्याला पकडणार नाहीत असे या युवकाला वाटले होते. पण इथेच तो चुकला. गुजरातच्या वलसाडमधील पारडी शहरात ही घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास पारीयारोडवर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना मोपेडवर एक महिला दिसली. तिेने पंजाबी ड्रेस घातला होता व चेहऱ्याभोवती ओढणी गुंडाळलेली होती.

महिला समजून सुरुवातीला पोलिसांनी दुचाकीला थांबवले नाही. पण दुचाकीवर असलेली महिला पुन्हा तिथे आली तेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी मोपेड थांबवली. पोलिसांनी इतक्या रात्री बाहेर पडण्याचे कारण विचारले?. त्यावेळी बाईकवर बसलेला युवक आपले बिंग फुटेल या भितीने काही बोलत नव्हता. तो चिन्हाने पोलिसांशी संवाद साधत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.

अखेर पोलिसांनी त्या महिलेला चेहऱ्यावरुन ओढणी हटवायला सांगितली. तेव्हा सर्व सत्य समोर आले. पोलिसांनी तसेच मुलीच्या पालकांनी पकडू नये, यासाठी मुलीचा वेश धारण केल्याचे युवकाने चौकशीमध्ये सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली होती. मंगळवारी संध्याकाळी जामिनावर त्या युवकाची सुटका झाली.