पोलीस स्टेशन… हे नुसतं नाव ऐकलं तरी अनेकजण दूर पळतात. पण, महाराष्ट्राच्या मीरा-भाईंदरमधील नया नगर पोलीस स्थानकाबाबत असं नाहीये. सध्या सोशल मीडियावर नया नगर पोलीस स्थानकाबाबतचा जुना गुगल रिव्ह्यू चांगलाच व्हायरल होत आहे.

नया नगर पोलिस स्‍टेशन सध्या अचानक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याला कारण आहे या पोलीस स्टेशनला मिळालेली गुगल रेटिंग. गुगलवर या पोलीस स्टेशनला पाचपैकी चार रेटिंग मिळालीये. आयपीएस अधिकारी संतोष सिंह यांनी ट्विटरवर या पोलीस स्टेशनबाबतचा गुगल रिव्ह्यू शेअर केल्यानंतर चांगलाच व्हायरल होत आहे. हा रिव्ह्यू पाच महिन्यापूर्वी मन्सूरी अवेश नावाच्या या इसमाने लिहिला आहे. “अटक झाल्यानंतर नया नगर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडून मला चांगली वागणूक मिळाली, इथलं लॉकअप चांगलं आहे, खोल्याही स्वच्छ आहेत. शिवाय जेवणही स्वादिष्ट आहे. एकूणच तिथला अनुभव चांगला होता…संधी मिळाली तर पुन्हा या पोलीस स्टेशनमध्ये जायला आवडेल”, असं मन्सूरी अली याने आपल्या रिव्ह्यूमध्ये नमूद केलं होतं. हा रिव्ह्यू ट्विट करताना, “पोलीस स्टेशन इतकं चांगलं की एखाद्याला पुन्हा अटक होण्याची इच्छा व्हावी” असं संतोष सिंह यांनी म्हटलं आहे. आपल्या रिव्ह्यूमध्ये सिंह यांनी काही सहकाऱ्यांनाही टॅग केलं असून रिव्ह्यूबाबत खातरजमा करण्यास सांगितलं आहे. आर्यन डी नावाच्या अजून एका व्यक्तीनेही असाच रिव्ह्यू लिहिला आहे. “हे जेल अपेक्षेपेक्षा खूप चांगलं होतं. मला रात्री जेवणामध्ये राजमा चावल देण्यात आले होते. तिथली लोकंही चांगली आहेत. पुन्हा तिथे जायला आवडेल” असं आर्यनने आपल्या रिव्ह्यूमध्ये म्हटलं आहे.

ही रेटिंग इंटरनेट वापरणाऱ्यांकडून आलेल्या इनपुटच्या आधारे ठरवली जाते. दरम्यान, हे रिव्ह्यू खरे आहेत की नाही, की केवळ मजा म्हणून अशाप्रकारचे रिव्ह्यू देण्यात आले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सोशल मीडियावर या पोलीस स्टेशनबाबतची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.