माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात. त्यातील अन्न आणि वस्त्राची जुळवाजुळव झाल्यानंतर निवारा अर्थात हक्काच्या घरासाठी मोठे कष्ट सोसावे लागतात. त्यानंतरच घराचे स्वप्न साकार होते. परंतू इतक्या कष्टानंतर मिळवलेले घर काही कारणांमुळे कवडीमोल भावाने विकायची वेळ आलीच तर विकणाऱ्यांना काय यातना होतील याची कल्पना न केलेलीच बरी. अशाच काहीशा यातना अमेरिकेत डेट्रोइट नगरीत राहणाऱ्या लोकांना भोगाव्या लागत आहेत.

डेट्रोइटमधील एका नागरिकाने झिलो या इ-कॉमर्स वेबसाईटवर आपले घर चक्क १ डॉलर म्हणजेच अवघ्या ७० रूपयांना विकले. सेंट क्लेअर एसटी या भागात असलेले हे घर तब्बल ३ हजार ४८४ चौरस फुटाचे होते. २० वर्षांपूर्वी हे घर बांधण्यासाठी घर मालकाने ३२ हजार ५५५ डॉलर खर्च केले होते. परंतू मंदीमूळे शहराची आर्थिक घडी विस्कटली आणि कोट्यवधी किंमतीची ही घरं आज कुणी अवघ्या काही डॉलर्समध्येही खरेदी करायला तयारी नाहीये.

डेट्रोइट हे अमेरिकेतील एक श्रीमंत शहर होते. अमेरिकेतील वाहन उद्योगाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेट्रोइटमध्ये दररोज कोट्यावधींची उलाढाल होत असे. परंतू २००८ – २०१० साली आलेल्या आर्थिक मंदीने या शहराचे दिवस फिरवले. या मंदीचा सर्वात मोठा फटका अमेरिकेतील वाहन उद्योगाला बसला. परिणामी डेट्रोइट शहराचा आर्थिक ऱ्हास होण्यास सुरवात झाली. आज या शहरात केवळ गतवैभवाच्या खूणा उरल्या आहेत. येथील उद्योगधंद्यांनी अमेरिकेतील इतर भागांत स्थलांतर केले आहे. उत्पन्नाच्या संधी अभावी तेथील नागरीकांनीही इतर शहरांमध्ये आपले बस्तान बसवण्यास सुरवात केली आहे. या संपूर्ण प्रकाराचा तेथील रिअल इस्टेट क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे तेथिल घरांना आज कवडीमोल भाव देखील उरलेला नाही.