भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने विशेष रजा मंजूर केली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी बायकोसोबत राहण्यासाठी विराटने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती.

बीसीसीआयने विराटची मागणी मान्य केली असून अ‍ॅडलेड कसोटीनंतर विराट भारतात परतणार आहे. ICC ने याबद्दलची माहिती दिली आहे.

विराटला ही सुट्टी मिळाल्याबद्दल सोशल नेटवर्किंगवर दोन गट पडल्याचे दिसत आहे. आपल्या प्रोफेश्नल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्याला प्राधान्य देणाऱ्या विराटचे काहींनी कौतुक केलं आहे. क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांनी ट्विटरवरुन विराट पहिल्या कसोटीनंतर परतणार असल्याचे सांगत ही मोठी बातमी असल्याचे म्हटले आहे. आजच्या तरुण खेळाडूंसाठी आयुष्य हे क्रिकेट खेळण्याबरोबरच इतर बरंच काही असतं. मात्र विराटच्या या निर्णयामुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा खडतर होणार हे ही स्पष्टचं आहे, असंही हर्ष ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मात्र त्याचवेळी सोशल मीडियावरील अनेकांनी विराटच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विराटसारख्या मोठ्या खेळाडूने देशासाठी खेळण्याचे ‘राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्या’ऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेकांनी विराटच्या या निर्णयानंतर २०१५ मध्ये भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दौऱ्यावर असतानाच मुलीच्या जन्मानंतर परत येण्याऐवजी संघाला प्राधान्य दिल्याची आठवण करुन दिली आहे. धोनीची पत्नी साक्षी विश्वचषक स्पर्धा सुरु असताना भारतातच होती. याच कालावधीमध्ये तिची प्रसुती झाली आणि झिवाचा जन्म झाला. मात्र मुलीच्या जन्मानंतर लगेच भारतात परतण्याऐवजी धोनीने संघाबरोबरच राहण्याचा निर्णय घेत मालिकेमधील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतरच तो परतला होता. झिवाचा जन्म ६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला. यानंतर दोनच दिवसांनी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सराव सामना रंगणार होता. याचवेळी एका पत्रकार परिषदेमध्ये धोनीला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तुला घरची आणि तुझ्या मुलीची आठवण येत नाही का?, त्यावर धोनीने नाही असं उत्तर दिलं होतं. पुढे बोलताना धोनीने, “सध्या मी माझे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करत आहे. त्यामुळे मी इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करु शकत नाही. आमच्यासाठी विश्वचषक स्पर्धा खूप महत्वाची आहे,” असंही सांगितलं होतं.

यावरुनच अनेकांनी विराटवर टीका केली आहे. हे पाहा काही ट्विट

प्राधान्य कशाला द्यावं हे समजायला हवं

… म्हणून धोनी खास

कोहली चांगले नेतृत्व नाही

एकीकडे कोहलीवर टीका होत असतानाच दुसरीकडे अनेकांनी हा कोहलीचा खासगी प्रश्न असल्याचे म्हणत त्याच्या निर्णयाचा आपण सर्वांनी आदर करायला हवा असं म्हटलं आहे.

हा खासगी निर्णय आहे

हा त्याचा हक्क आहे

हे सगळं चालतं मग…

हा वादाचा विषय नाही

कोहलीचा आदर्श घ्या

चांगली बातमी आहे

हर्ष यांच्या ट्विटवर एवढ्या प्रतिक्रिया आलेल्या पाहून त्यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. “कोहली नसल्याने दौरा नक्कीच आव्हानात्मक होईल कारण तो खूप मोठा आणि महत्वाचा खेळाडू आहे. मात्र आपण त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. पालक होणं ही सुद्धा खूप खास गोष्ट असते,” असं हर्ष म्हणाले आहेत. यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करुन नक्की कळवा.