आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेल्या महेंद्रसिंह धोनीने खेळाच्या मैदानाव्यतिरीक्त आपली दुसरी इनिंग सुरु केली आहे. रांची येथील आपल्या फार्महाऊसवर धोनीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरु केला होता. हा प्रयोग यशस्वी झाला असून आपल्या फार्महाऊसवर आलेल्या पिकांची विक्री करायला धोनीने सुरुवात केली आहे. धोनी सध्या आपली पत्नी साक्षीसोबत दुबईत आहे, धोनीच्या फार्महाऊसचा मॅनेजर सध्या ही सर्व जबाबदारी पार पाडतो आहे.

कसं आहे धोनीचं फार्महाऊस? पाहा हे खास फोटो – ७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, जाहीराती, आयपीएल यामधून कोट्यवधीची कमाई करणाऱ्या धोनीने आपल्या फार्महाऊसमधील टोमॅटो आणि दूध विकण्यास सुरुवात केली आहे. धोनीच्या फार्महाऊसमध्ये ८० किलो टोमॅटोचं उत्पादन आलं असून त्यातील ७१ किलो टोमॅटो हे ४० रुपये किलोच्या दराने विकले गेले आहेत. याव्यतिरीक्त २० दिवसांनी धोनीच्या फार्महाऊस मधून कोबी, शेंगा, फ्लॉवर, स्ट्रॉबेरी, ब्रोकली अशा भाजाही बाजारात येणार आहे. धोनीच्या फार्महाऊसमधील भाज्यांचं मार्केटींग व व्यवस्थापन सांभाळणाऱ्या शिवनंदन यांनी दैनिक भास्करशी बोलताना माहिती दिली.

दरम्यान धोनीने पंजाबवरुन खास ६० जर्सी आणि शहवाल गायी मागवल्या होत्या. या गाईंचं कोणतीही भेसळ नसलेलं दूध धोनी विकतो आहे. झारखंडमधील अपर बाझार, लालपूर, वर्धमान कंपाऊंड या भागात धोनीच्या फार्महाऊसमधील सेंद्रीय पिकांची विक्री होत आहे. याशिवाय पी.पी. कंपाऊंड भागातही काही दिवसांनी स्टॉल तयार केले जाणार असल्याची माहिती शिवनंदन यांनी दिली. काही दिवसांपूर्वी धोनीने मध्य प्रदेशातून २ हजाप कडकनाथ कोंबड्यांच्या पिलाची ऑर्डर दिली होती.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनी पडला ‘कडकनाथ’च्या प्रेमात, रांचीतील फार्म हाऊसवर पाळणार २ हजार कोंबड्या