अटीतटीच्या झालेल्या आयपीएलच्या 11 व्या सत्रातील 30 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा जलवा पाहायला मिळाला. त्याने केवळ 22 चेंडूंमध्ये 56 धावांची तुफानी खेळी केली. कारकिर्दीच्या सुरूवातीला धोनी ज्याप्रमाणे खेळायचा त्याच जुन्या रंगामध्ये धोनी परतल्याचं आयपीएलच्या या सत्रात दिसत आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही धोनीने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा काढल्या.

आयपीएलच्या 8 सामन्यांमध्ये 186 च्या स्ट्राइक रेटने धोनीने 286 धावा केल्या असून सर्वात जास्त धावा करणा-यांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त षटकार ठोकणा-यांमध्येही 20 षटकार मारुन धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्यामध्ये एक नंबरवर असलेल्या ख्रिस गेलपेक्षा तो केवळ 3 षटकार मागे आहे.

गंभीरला मागे टाकून स्वतःच्या नावे केला विक्रम – दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीची तुफान फटकेबाजी पाहून समालोचक देखील आनंदी झाले आणि विस्फोटक फॉर्ममध्ये धोनी का परतला याचं कारण सांगितलं. धोनी सध्या सातत्याने जिममध्ये घाम गाळतोय. तो रोज 3 तासांपेक्षा जास्तवेळ जिममध्ये स्वतःवर मेहनत घेतो, हेच कारण आहे ज्यामुळे धोनी पुन्हा एकदा गगनभेदी षटकार मारत आहे, असं समालोचक सामन्यादरम्यान म्हणाले. या सामन्यात धोनीने यंदाच्या आयपीएलमधील दुसरा सर्वात उत्तुंग षटकार (108 मीटर) ठोकला. याशिवाय धोनीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. धोनीने गौतम गंभीरला मागे टाकलं. कर्णधार म्हणून गंभीरच्या नावावर सर्वाधिक 3 हजार 518 धावांची नोंद होती. मात्र, दिल्लीविरुद्धच्या धमाकेदार खेळीनंतर धोनीच्या नावावर 3 हजार 536 धावा झाल्या आहेत.