आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंना धक्का बसला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून करोना झालेल्या सदस्यांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं असून इतर सर्व खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधीही वाढवण्यात आला आहे. परंतू जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने, खेळाडूंसाठी काही नियम आखून दिले होते. दुबईत ताज हॉटेलमध्ये राहत असलेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी याच नियमांचा भंग केल्याचं बोललं जातंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत चेन्नईचे खेळाडू हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर स्थानिक व्यक्तीसोबत हात मिळवून त्याची गळाभेट घेताना दिसत आहे. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना सोशल डिस्टन्सिंगसह संघाबाहेर व्यक्तीच्या संपर्कात न येण्याचा नियम घालून दिलाय. मात्र चेन्नईच्या खेळाडूंकडून याच नियमाचं उल्लंघन झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने करोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दलही अद्याप अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही. परंतू चेन्नईच्या खेळाडूंकडून या नियमांचा भंग झाला असल्यास आयपीएलच्या एकंदरीत आयोजनावर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

जाणून घेऊयात काय आहेत खेळाडूंसाठी बीसीसीआयने तयार केलेले नियम –

१) युएईत दाखल झाल्यानंतर ६-१४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत इन-हाऊस रुम सर्विस, हाउस किपींग अशा सुविधा खेळाडूंना मिळणार नाहीत. OR कोड द्वारे खेळाडू मोबाईलमधून आपल्याला जी गोष्ट खाण्यासाठी हवी आहे ती मागवू शकतात. डिस्पोजेबल प्लेटमध्ये तो पदार्थ खेळाडूंना मिळेल.

२) खेळाडूंच्या खोलीबाहेर हॉटेलच्या लॉबी परिसरात वेगळा टॉवेल, टॉयलेटमधलं सामान, पाणी अशा गोष्टी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

३) खेळाडूंच्या सेवेत असलेल्या हॉटेल स्टाफना मास्क आणि ग्लोव्ह्ज घालणं बंधनकारक करण्यात आलंय. ३ महिन्यांसाठी या कर्मचाऱ्यांना हॉटेल सोडण्यास मनाई करण्यात आली असून प्रत्येक ३ दिवसांनी या कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी करण्यात येणार आहे.

४) तसेच खेळाडूंच्या सेवेत असलेला हॉटेल स्टाफ हा इतर ग्राहकांना सेवा देणार नाही.

५) प्रत्येक खेळाडू हा दिवसातले २४ तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असतील.

६) खेळाडूंना मोकळं वातावरण मिळावं यासाठी खोलीबाहेर सोय करुन देण्यात येईल.

७) सरावादरम्यान खेळाडू आपलं साहित्य स्वतः सॅनिटाईज करुन घेऊन जातील. सरावाच्या ठिकाणी सामान ठेवण्यासी सोय खेळाडूंसाठी नसेल.

८) सरावादरम्यान खेळाडूंना काही गोष्ट लागल्यास एक व्यक्ती खास त्यांच्या सेवेत असेल, जो हॉटेलमध्ये जाऊन स्वतःला सॅनिटाईज करुन ती वस्तू घेऊन येईल.

९) स्पॉन्सर शूटसाठी संघांना स्थानिक तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागेल.

१०) प्रत्येक संघातील खेळाडूंना रोजच्या व्यवहारादरम्यान हँड सॅनिटायजरचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलंय.

११) एखाद्या खेळाडूकडून Bio Security Bubble मोडलं गेलं…तर तो खेळाडू पुन्हा स्वतःला क्वारंटाइन करुन घेईल. क्वारंटाइन कालावधी संपत असताना त्या खेळाडूला स्वतःची करोना चाचणी करवुन घेऊन मग पुन्हा एकदा Bio Security Bubble मध्ये प्रवेश मिळणार आहे.

१२) प्रत्येक खेळाडूंचा आरोग्य विमा असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

१३) सरावाला जाताना आणि सामन्यादरम्यान बसमध्ये खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करण्यासाठी एक जागा सोडून बसणं बंधनकारक करण्यात आलंय.