पश्चिम बंगालच्या दिघा येथे मच्छिमाराच्या जाळ्यात एक अनोखा मासा अडकला. एखाद्या ‘फ्लाइंग शिप’प्रमाणे दिसणारा हा मासा तब्बल 800 किलोग्रॅम वजनाचा आहे. हा अत्यंत दुर्मिळ मासा असून तो ‘चिलशंकर फिश’ या नावाने ओळखला जातो.

सोमवारी पश्चिम बंगालच्या दिघामध्ये समुद्राच्या तळापर्यंत जाळे ओढत नेणाऱ्या बोटीला (ट्रॉलर) 780 किलोग्रॅम वजनाचा चिलशंकर मासा अडकला. ज्याच्या ट्रॉलरला हा मासा अडकला तो मूळ ओडिशाचा रहिवासी आहे. हा अनोखा मासा पकडून किनाऱ्यावर आणल्यानंतर बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.

जास्त वजन असल्याने या माशाला एका जागेवरुन दुसरीकडे हलवणंही कठीण झालं होतं. त्यामुळे या वजनदार माशाला एका रस्सीच्या सहाय्याने बांधून एका व्हॅनमध्ये ठेवण्यात आलं व ही व्हॅन मोहाना फिशर असोसिएशनमध्ये नेण्यात आली. त्यानंतर मार्केटमध्ये हा चिलशंकर मासा आणण्यात आला आणि या एका माशामुळे तो मच्छीमार लखपती झाला.

मार्केटमध्ये या दुर्मिळ चिलशंकर माशाला 2100 रुपये प्रति किलोग्रॅम इतका भाव मिळाला. म्हणजेच या माशासाठी मच्छिमाराला जवळपास 20 लाख रुपये मिळाले. करोना संकटकाळात लॉकडाउनमध्ये माशामुळे मिळालेली जवळपास 20 लाख रुपयांची रक्कम त्या मच्छिमारासाठी लॉटरीच ठरली आहे.