तेजस ठाकरे यांचे संशोधन,  ‘ठाकरेज कॅट स्नेक’ असे नामकरण

नागपूर : सरडे, पाली, बेडूक खाणारे साप आपण सर्वानी पाहिले आहेत, ऐकले आहेत. मात्र, फक्त झाडावरील बेडूक खाणारा साप ऐकिवात किंवा वाचनात नसेल. हा साप जमिनीवरील किंवा पाण्यातील बेडकाकडे पाहात देखील नाही. महाराष्ट्रातील तरुण संशोधक तेजस ठाकरे यांनी हा शोध लावला असून तो जगातील संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय ठरू शकेल. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या २६ सप्टेंबरच्या अंकात सरीसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांचा याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट वनस्पती, जीवजंतूंनी समृद्ध असल्याने आजपर्यंत सर्वाधिक वनस्पती, जीवजंतूंच्या प्रजाती शोधता आल्या. अशाच एका प्रयत्नात संशोधक तेजस ठाकरे यांना मांजऱ्या प्रजातीतील एक साप शोधण्यात यश आले. त्यांनी ही बाब सरीसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांच्या निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर गिरी यांच्या नेतृत्वाखाली वर्गीकरणशास्त्रज्ञ अशोक कॅप्टन, जर्मनीतील म्युझियम फर नेचरकुंडे बर्लीनचे डॉ. फ्रॅक टिळक, लंडनच्या नॅचलर हिस्ट्री म्युझियमचे डॉ. व्ही. दीपक, कोल्हापूरचे निसर्ग अभ्यासक स्वप्निल पवार यांनी संशोधनानंतर हा शोधनिबंध पूर्ण केला. सर्वप्रथम हा साप संशोधक तेजस ठाकरे यांच्या निदर्शनाला आल्यामुळे या नव्या प्रजातीला ‘ठाकरेज कॅट स्नेक’असे नाव दिले आहे.

भारतात विविध ठिकाणी या प्रजातीचे साप सापडत असले तरीही काही प्रजाती या प्रामुख्याने पश्चिम घाटातच सापडतात. भारतातील गोडय़ा पाण्यातील खेकडय़ांवर तेजस ठाकरे यांचा अभ्यास आहे. त्याच्या पाठिंब्यामुळे उत्तर पश्चिम घाटात अन्य  अभ्यासकांना या प्रजातीचे वर्गीकरण करता आले आहे. १८९४ मध्ये पश्चिम घाटातच सापडलेल्या सापाच्या वंशातील ही प्रजाती आहे.  यापूर्वी पश्चिम घाटातील मांजऱ्या सापाच्या प्रजातीत याप्रकारच्या सापाची नोंद झालेली नव्हती. मांजऱ्या प्रजातीतील इतर साप जमिनीवरचे, पाण्यातले बेडूक, सरडे, पाली खातात.

झाडांवरील बेडूक खाणारा हा जगातील पहिला साप असावा. अभ्यासादरम्यान बरेचदा त्याला जमिनीवरील, पाण्यातील बेडूक देण्याचा प्रयत्न केला. हे बेडूक आम्ही झाडावर देखील ठेवले, पण त्याने स्पर्शही केला नाही. झाडांवर आढळणारा बेडूक तो सहजपणे खात होता. त्यामुळे यावर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे.

– डॉ. वरद गिरी, सरीसृपतज्ज्ञ.