कोणत्या गोष्टीची टॅगलाईन कशावरुन होईल सांगता येत नाही. आता हेच पाहा ना नाइकी या जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या शूज ब्रँडची टॅगलाईन कशी आली हे ऐकून थक्क व्हाल. एका खूनाच्या हत्याकांडावरुन प्रेरित होऊन ही टॅगलाईन बनविण्यात आली आहे. हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला प्रत्यक्ष फाशी देण्याची वेळ आली तेव्हा या व्यक्तीला त्याची शेवटची इच्छा काय आहे असे विचारण्यात आले. अतिशय गाजलेल्या खूनप्रकरणातील आरोपी काय बोलतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं , तेव्हा मरण्याच्या आधी त्यानं ‘लेटस डू धिस’ हे वाक्य म्हटलं होतं.

नाइकीची जाहिरात करणाऱ्या एजन्सीतील कर्मचाऱ्याला हा प्रसंग आठवला आणि या नाइकीच्या लोगोला अतिशय साजेशी अशी ही कॅप्शन अखेर मिळाली. एका मासिकाला मुलाखत देत असताना नाइकीच्या जाहिरातीसाठी काम करणाऱ्या डॅन विडेन यांनी ही गोष्ट उघड केली.

गॅरी गिलमोर याने अमेरिकेतील युटा येथील असंख्य लोकांचा विविध कारणांसाठी खून केला होता. हे हत्याकांड खूपच गाजलं होतं. त्यानंतर त्याला पकडण्यात पोलीस दलाला यश आलं . १९७७ मध्ये त्याला खूनाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी त्याने शेवटची इच्छा व्यक्त करताना हे शब्द उच्चारले होते. मला त्याने उच्चारलेले शब्द न आवडल्याने मी त्याचे ‘जस्ट डू इट’ असे केले असेही त्यांनी सांगितले. पुढे जाऊन हे इतके प्रसिद्ध होईल असे मला वाटले नव्हते असेही तो म्हणाला. अशाप्रकारे एका खून खटल्यामुळे एका ब्रॅंडला आपली टॅगलाईन मिळाली.