सोनेरी केसांची, सुडौल बांध्याची, उंच हिल्स आणि शॉर्ट कपडे घालणारी बार्बी म्हणजे अनेक मुलींसाठी जीव की प्राणच. नव्वदच्या दशकात ही बार्बी आपल्याकडे आली अन् आपल्या गोड गोजीऱ्या भातुकलीची जागा तिनं कधी घेतली हेही कळलं नाही. या बार्बीनं जगभरात लोकप्रियतेचं शिखर गाठलं. जिच्यासोबत खेळत आपण लहानाचे मोठे झालो त्या बार्बीचं पूर्ण नाव तुम्हाला माहितीये?

अनेकदा आपण तिला ‘बार्बी’ याच नावानं ओळखतो पण, आश्चर्य म्हणजे ही बाहुली तयार  करणाऱ्या दाम्पत्यांनं तिचं नामकरण केलं होतं. ‘बार्बरा मिलीसेंट रॉबर्ट.’ असं बार्बीचं संपूर्ण नाव. गेल्याच आठड्यात ‘सिबलींग डे’ साजरा करण्यात आला. त्यावेळी बार्बीच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून या दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळीच अनेकांना बार्बीचं पूर्ण नाव माहिती झालं. ज्या दाम्पत्यानं बार्बी तयार केली त्यांनी आपली मुलगी बार्बरावरून या सुंदर बाहुलीला बार्बी असं नाव दिलं. १९४५ साली रूथ आणि इलियट हँडलर दांपत्याने ‘मॅटल’ ही खेळण्याची कंपनी स्थापन केली. जर्मनमेड ‘लीली’डॉलवरून रुथ आणि इलियटला बार्बी तयार करण्याची कल्पना सुचली. १९५९ मध्ये न्यूयॉर्क सिटीतल्या टॉयफेअरमध्ये पहिली बार्बी विक्रीसाठी ठेवण्यात आली. त्यावेळी अधिकतर बाहुल्या बाळरूपात आढळायच्या त्यामुळे ही प्रौढ बाहुली अनेकांना वेगळी वाटली. बघता बघता ही बाहुली हातोहात खपू लागली.

पहिल्याच वर्षी तीन लाख बाहुल्यांच्या खपासह बार्बी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती. १९८७ साली बार्बी पहिल्यांदा भारतात आली. बार्बी जगभरात प्रसिद्ध झाल्यावर या कंपनीनं तिचं कुटुंबही आणलं. फक्त गौरवर्णीय आणि सडपातळ इतकंच बार्बीच रुप मर्यादीत न ठेवता त्या त्या देशाप्रमाणे बार्बीच्या दिसण्यातही कंपनीनं बदल केले त्यामुळे त्वचेच्या विविध रंगामध्ये, शरीरयष्ठीप्रमाणे आता बार्बी जगभरात उपलब्ध आहे इतकंच नाही तर भारतात साडी परिधान केलेली बार्बीही आणली होती.